गोंदिया : सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त असलेल्या सर्व महामंडळाच्या योजनांच्या प्रगतीचा आणि प्रलंबित प्रकरणांना आढावा पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी शासकीय विश्रामगृहात घेतला.पालकमंत्री बडोले यांनी नागपूर विभागातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा नागपूर येथील महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांकडून सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त असलेल्या महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, संत रविदास चर्मकार विकास महामंडळ, ओबीसी विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळ, अपंग विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ आदी महामंडळांच्या योजनांच्या प्रगतीचा व प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेतला.पालकमंत्री बैठकीत म्हणाले, महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ संबंधित लाभार्थ्यांना देण्याच्या दृष्टिने योजनांची माहिती जास्तीत जास्त लाभार्थ्यांना व नागरिकांना झाली पाहिजे. या योजनांच्या लाभातून लाभार्थी हा आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे. योजनांचा लाभ देतांना गरजू लाभार्थ्यांची निवड संबंधित महामंडळांनी करावी. लाभार्थी हा स्वावलंबी कसा होईल यादृष्टिने महामंडळांनी काम करावे. लाभार्थ्यांची जी कर्ज प्रकरणे बँकांकडे प्रलंबीत आहेत अशा बँकेकडे स्वत: व्यवस्थापकांनी जाऊन ती कर्ज प्रकरणे मंजूर करुन घ्यावी. कर्ज प्रकरणे मंजूर करण्यासाठी महामंडळाच्या व्यवस्थापकांनी सातत्याने पाठपुरावा करावा.महामंडळाच्या विविध योजनांची माहिती लाभार्थी व नागरिकांना व्हावी यासाठी जिल्हास्तरावर जनजागृती मेळावे घेण्यात यावे असे सांगून पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, या मेळाव्यांमुळे मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांना योजनांची माहिती होऊन संबंधित योजनांचा लाभ घेणे सोईचे होईल. ज्या लाभार्थ्यांकडे कर्जाची वसूली थकीत आहे अशा लाभार्थ्यांनीसुद्धा कर्जाची परतफेड वेळीच करावी. त्यामुळे त्याला पुढे आवश्यक त्यावेळी कर्ज देता येईल. कर्ज प्रकरणे महामंडळाने बँकेत सादर करण्यापुर्वी आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता लाभार्थ्यांकडून करण्यात आली.
पालकमंत्र्यांनी घेतला योजनांचा आढावा
By admin | Updated: March 11, 2015 01:20 IST