गर्रा (खुर्द) गौग्राम घोषित : शेण खतानेच केली जाणार शेती गोंदिया : पहिलीच्या पुस्तकापासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत गाय ही माता असल्याची शिकवण दिली जाते. शिक्षीत ही शिकवण विसरले असून मातेचीच हत्या केली जात आहे. मात्र तालुक्यातील गर्रा (खुर्द) येथील गावकऱ्यांना ती शिकवण आठवून असून त्यांनी गावाला गौग्राम घोषीत केले आहे. आता या गावातील कुणीही गायीची विक्री करणार नाही तसेच शेतीत रासायनीक खतांचा वापर सोडून फक्त शेणखताचाच वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी गावातील महिलांनी मंडळाची स्थापना केली असून त्यांनीच या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. हिंदू धर्मात गायीला मातेचा दर्जा देण्यात आला असून तिचे पूजन केले जाते. आज मात्र आपल्या फायद्यासाठी त्या मातेचीच विक्री केली जात असल्याचे दिसून येते. आपल्या स्वार्थासाठी होत असलेल्या गोहत्येच्या या प्रकारावर आळा घालण्यासाठी ग्राम गर्रा येथे महिलांनी पुढाकार घेत १० सप्टेंबर रोजी सभा घेऊन साईधाम महिला मंडळाची स्थापना केली. या मंडळाने आता पुढे गावातील कुणीही गाईची विक्री करणार नाही असा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या कार्यासह गावात शांती व धार्मिकतेचे वातावरण निर्माण व्हावे या उद्देशातून साईंची शोभायात्रा काढण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार लगतच्या ग्राम गोंडीटोला व लोधीटोला येथे शोभायात्रा काढण्यात आली. यासह धनंजय तुरकर यांच्या हस्ते गर्रा येथे आरती व महाप्रसाद वितरणाचा कार्यक्रमही पार पडला. तर याप्रसंगी मंहिला मंडळाद्वारा घोषीत गौग्रामच्या पोस्टरचे प्रकाशनही तुरकर यांच्या हस्ते करण्यात आले. आपले दूधच काय तर शरिरातील प्रत्येक अवयवातून मानवजातीला फायदाच मिळवून देणाऱ्या गौमातेचे उपकार फेडता येणार नाही. मात्र तिच्या प्रती असलेली मानवाची काही जबाबदारी पार पाडता यावी यासाठी महिला मंडळाने घेतलेल्या निर्णयाला सर्वांनी सहकार्य करण्याचे व या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन मंडळातील दिपा दरवडे, सुषमा गावड, शालू शहारे, सरीता तुरकर, सिंधू भोयर, तिरूकला तुरकर, गुणवंता तुरकर, केसर भोयर, कमला कुंभीरकर, ललीता तुरकर, निर्मला ठाकरे, दिपीका बोपचे, वंदना दिहारी, शशीकला न्यायकरे, ज्ञानेश्वरी तुरकर, मानवी बोपचे, नीलावंती तुरकर, वंदना रहांगडाले, छन्नू टेंभरे, वर्षा पटले, छमेश्वरी रहांगडाले, कुंदा दरवडे आदिंनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)शेण खताचा वापर व प्रक्रिया केंद्र सुरू करणार पिकांसाठी शेणखतापेक्षा महत्वपूर्ण खत दुसरे कोणतेही नसताना रासायनिक खतांचा भरमसाट वापर करून खाद्यान्न विषारी केले जात आहे. मात्र आता हा प्रकार गर्रा येथे चालणार नसल्याचा निर्णय महिला मंडळाने घेतला आहे. गावातील कुणीही गौमातेची विक्री करणार नसतानाच आता शेणखताचा वापरही आपल्या शेतात क रावयाचा असून त्यातूनच पीक घ्यायची आहेत. शिवाय धान शेती झाल्यावर उर्वरित सहा महिन्यांच्या काळात भाजीपाला, फळ व गायीच्या चाऱ्यासाठी गवताची लागवड केली जाईल. तसेच गाईचे दूध बाहेर न विकता गावातच खोवा, पनीर, तूप व मिठाई निर्मितीसाठी प्रक्रिया केंद्र सुरू केले जाईल व यातून गावचा विकास होणार असल्याचे साई कुष्ठ व एड्स सेवा संस्था अध्यक्ष अॅड. विरेंद्र जायस्वाल यांनी कळविले.
गोमातेच्या विक्रीस लागणार लगाम
By admin | Updated: September 18, 2015 01:34 IST