गोंदिया : नागरिकांचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी पालकमंत्री अनिल देशमुख यांनी अर्जुनी-मोरगाव
येथे बुधवारी (दि. २७) आयोजित केलेल्या जनता दरबारात भरपूर प्रमाणात निवेदन आलेत. धान खरेदी, ऊर्जा, शिक्षण, आरोग्य, घरकुल पट्टे, वन हक्क पट्टे व रोजगार हमीची कामे या समस्यांचा यात प्रमुख्याने समावेश होता. आलेल्या प्रत्येक निवेदनावर त्या-त्या विभागाने कारवाई करून लवकरात लवकर लेखी उत्तर दयावे, असे निर्देश पालकमंत्री अनिल देशमुख यांनी दिले.
यावेळी खासदार प्रफुल पटेल, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी नागरिकांचे निवेदन स्वीकारून तत्काळ कार्यवाहीसाठी संबंधित विभागाला सोपविले.
निवेदन घेऊन येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे म्हणणे ऐकून घेऊन व त्यावर योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन देऊन पालकमंत्र्यांनी समाधान करण्याचा प्रयत्न केला. बऱ्याचशा नागरिकांनी लेखी निवेदन सादर करून जनता दरबारात आपल्या समस्या मांडल्या.
ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात डॉक्टर उपस्थित राहत नाही, दवाखान्यात स्वच्छता राहत नसल्याच्या
तक्रारी यावेळी करण्यात आल्या. याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी आरोग्य विभागाला दिले.
रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत नागरिकांनी प्रश्न मांडला. पंतप्रधान सन्मान योजनेचा हप्ता मिळण्याबाबत निवेदन, रोजंदारी नोकर भरती, वीजपुरवठा, कृषी पंप वीज जोडणी, पीक विमा लाभ, वनहक्क पट्टे, आदी विषयांवरील निवेदन यावेळी सादर करण्यात आले. या सगळ्या निवेदनांवर संबंधित विभागाने तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
याप्रसंगी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी, शेतकऱ्यांच्या धानाला ७०० रुपये बोनस देण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न नक्कीच सोडविण्यात येतील. शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करून मक्याची शेती केली तर नक्कीच फायदा होईल, असे सांगितले. आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी, आपला जिल्हा धान उत्पादक जिल्हा आहे. जिल्ह्याचे प्रश्न सातत्याने मांडण्याचा प्रयत्न करीत असतो. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले. प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी उषा चौधरी यांनी मांडले. आभार तहसीलदार विनोद मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाला अर्जुनी-मोरगाव परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
------------------------
धान खरेदीबाबतच सर्वाधिक निवेदन
यावेळी धान खरेदीबाबत मोठ्या प्रमाणात निवेदन प्राप्त झाले. धान उत्पादक शेतकऱ्यांचा सगळा धान खरेदी
करण्यात येईल. कोणाचेही धान शिल्लक राहणार नाही अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. धान भरडाई बाबत
लवकरच मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात येणार असून, या बैठकीत योग्य तो मार्ग काढला जाईल, असेही त्यांनी सांगितले.