रिसामा येथील प्रकार : भूमी अभिलेख कार्यालय वाऱ्यावरआमगाव : रिसामा येथील सातबारा अभिलेख एकत्रीकरण योजनेत प्रचलित होते. सदर गावी पुनर्मोजणी तसेच गावठाण भूमापन झालेले आहे. सदर गटाचे अभिलेख पुनर्मोजणी योजनेत किंवा गावठाण नगर भूमापन योजनेत तयार झाले नाही. तालुक्याचे भूमी अभिलेख कार्यालय रामभरोसे सुरू आहे. रिसामा येथील शेतकऱ्यांच्या जमिनीची नोंद सातबाऱ्यात नसल्याने अनेकांची कामे खोळबंली आहेत. रिसामा येथील जुन्या गटाचे अभिलेख दुरूस्ती करण्याबाबत २७ मार्च २०१४ रोजी पत्र देण्यात आले. सदर पत्राच्या अनुषंगाने जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख, महाराष्ट्र, पुणे कार्यालयातून (सीटीएस/ सीआर/ ८०२१/ ना.भू.४/ २०१० दि. १५ जुलै २०११) या पत्रान्वये आपले एकत्रीकरण योजनेतील प्रचलित गट क्रमांक पूर्ववत कायम समजण्यात यावे व सदर गटाचे सातबारा मिळण्याबाबत तलाठी किंवा तहसीलदार यांच्याशी संपर्क करावा, अशाप्रकारे स्पष्ट आदेश आहेत. परंतु रिसामा येथील शेतकऱ्यांना त्यांच्या स्वत:च्या जमिनीची नोंद सात-बाऱ्यात केली गेली नाही. या प्रकारामुळे शेतीच्या मालमत्तेसंदर्भात तलाठी कार्यालयातून कोणतेच दाखले मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यात तसेच शेतकऱ्यांना कर्जाकरिता कागदाची पूर्तता होत नसल्याने मोठे संकट समोर उभे झाले आहे. वरिष्ठांचे लेखी आदेश असून भूमी अभिलेख कार्यालयातून गावठाण किंवा नगर भूमापन योजनेत तयार नाही. याकरिता जे दोषी अधिकारी आहेत, त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी. तसेच जुने अभिलेख दुरूस्त करून सातबारा देण्यात यावे, अशी मागणी होती. परंतु उपविभागीय अधिकारी देवरी, तलाठी, तहसीलदार यांनीसुध्दा कोणतीच कार्यवाही केली नाही. जवळपास ३०० शेतकऱ्यांची नोंद सातबाऱ्यात नाही. आपली समस्या शेतकऱ्यांनी सांगून अधिकारी मुळीच लक्ष देत नाही, असा आरोप रिसामा येथील शेतकऱ्यांनी केला आहे. (तालुका प्रतिनिधी)
सातबाऱ्यातून नोंदच गायब
By admin | Updated: July 17, 2015 01:19 IST