देवरी: आदिवासी विकास महामंडळ मर्यादित प्रादेशिक कार्यालय भंडारा येथे कार्यरत प्रादेशिक व्यवस्थापक अविनाश राठोड यांची या कार्यालयअंतर्गत येणाऱ्या सर्व कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रतिवागणूक चांगली नाही. तसेच कर्मचाऱ्यांवर जातीवाचक शब्द वापरून कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास देणे, कर्मचाऱ्यांवर विनाकारण दबाव टाकणे, अशाप्रकारचे अनेक कृत्य प्रादेशिक व्यवस्थापकाकडून सुरू असल्याचा आरोप आहे. त्यांची बदली करण्याची मागणी गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील आदिवासी विकास महामंडळाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री व आदिवासी विकास महामंडळाचे अध्यक्ष ॲड. के. सी. पाडवी यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनातून प्रादेशिक व्यवस्थापक राठोड हे अधिकारी कर्मचाऱ्यांना जातीवाचक शब्दाचा वापर करून मानसिक त्रास देणे, पैशाची मागणी करणे, कर्मचाऱ्यांवर विनाकारण दबाव टाकणे, कर्मचाऱ्याविरुद्ध कागदोपत्री रेकार्ड तयार करणे, रोजंदारी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची धमकी देणे, कर्मचाऱ्यांना कार्यालयीन काम संपल्यानंतरही विनाकारण रात्री उशिरापर्यंत थांबवून ठेवणे, या कृत्यामुळे येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यामध्ये असंतोष आहे. यामुळे त्यांचे मानसिक संतुलन ढासळलेले आहे. अधिकारी राठोड यांनी यापूर्वीही आदिवासी विकास महामंडळात सेवा पाहता अत्यंत खराब आहे. प्रत्येक कार्यालयात त्यांच्याविरुद्ध तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तक्रार केलेली आहे. त्यामुळे त्यांची त्वरीत बदली अथवा बडतर्फ करण्यात करण्यात यावे, अशी मागणी गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील आदिवासी विकास महामंडळाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे. अन्यथा या विरोधात लेखनी बंद आंदाेलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे. शिष्टमंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये उपप्रादेशिक कार्यालय देवरीचे प्रभारी व्यवस्थापक आर. बी. चव्हाण, नवेगावबांधचे व्यवस्थापक गणेश सावळे, भंडाराचे व्यवस्थापक डी. सी. चौधरी, ए. एल. धुर्वे,लेखापाल एस. के. बोरकर, एस. के. भगत यांचा समावेश होता.