सौंदडवासीयांची मागणी : अपघातांची शक्यता बळावली सौंदड : येथील बरबाद चौक ते राका मार्ग तर बाजारवाडी ते नागरिक शाळा क्र.१ जवळील रेल्वे गेट समोरील जागेत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढत चालले आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. रेल्वे गेट समोरील दोन्ही बाजूला वनवे मार्ग असल्याने अपघातांची शक्यता नाकारता येत नाही. याकरिता राका मार्गावरील रेल्वे गेट समोरील अतिक्रमण हटविण्याची मागणी सौंदडवासीय करीत आहेत. रेल्वे गेट समोरील जागेत शासन मान्य मद्य विक्री केंद्राचे साठवण केंद्र असल्याने संबंधीत जागेवर रोजच ट्रक खाली करण्याकरिता या ठिकाणावर लावले जातात. या मुख्य मार्गावर रोजच उभ्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. तर जागेवरच या मार्गाला वळण असल्याने समोरून येणारे वाहन दिसत नाही, परिणामी अपघात घडतात. तर दुसरीकडे नागरी शाळा क्रं.१ समोरील जागेत पानटपऱ्या थाटात उभ्या असल्याने कधी अपघात होणार याचा मात्र नेम नाही. त्यामुळे संबधितांनी जनतेच्या सुरक्षेकडे लक्ष्य देण्याची गरज आहे. तर दुसरीकडे याच शालेय परिसरात मोठ्या प्रमाणात मद्य विक्री, पानमसाले, गुटखा, सट्टापट्टी या सारखे अवैध धंदे होत आहेत. या ठिकाणातील अवैध कामांना बंद करण्याकरीता अनेकांनी प्रयत्न केले मात्र अपयश हाती आले. करीता संबंधीत जनप्रतीनिधी व ग्रामपंचायतने शाळा परिसरातील दुकाने बंद करावी अशी मागणी पालक वर्गाकडून होत आहे. तर राका मार्गावरील रेल्वे गेट समोरील अतिक्रमण हटविण्यात यावे अशी मागणी प्रवाशांंकडून केली जात आहे. (वार्ताहर)
सौंदड येथील रेल्वेगेट समोरील अतिक्रमण हटवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2017 00:58 IST