बिजेपार : भरकटून गावात आल्यानंतर गावठी कुत्र्यांच्या तावडीतून स्वत:ला वाचवत एका निलगायीने येथील वाघमारे यांच्या वाड्यात आसरा घेतला. तिला वनकर्मचाऱ्यांच्या सहकार्याने जीवदान देण्यात आले.शुक्रवारला सकाळी सहा वाजताच्या वेळेस अंदाजे तीन वर्षे वयाची ही निलगाव रक्तबंबाळ होवून जंगलातून बिजेपार येथे वस्तीमध्ये शिरली. ती वाघमारे वाड्यात येवून गुरांच्या गोठ्यात शिरण्याचा प्रयत्न करीत होती. तिच्यामागे गावठी कुत्र्यांचा झुंड लागला होता. कुत्रे तिच्या मागच्या पायांना चावा घेवून तिला घायाळ करीत होते. लगेच गावकऱ्यांना ही बाब लक्षात येताच तिला वाचविण्यासाठी गावकरी सरसावले व कुत्र्यांना हाकलून तिला दिलीप वाघमारे यांच्या घरी बांधून ठेवण्यात आले.यानंतर याची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून देण्यात आली. बिजेपार येथे सहायक वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे कार्यालय आहे. या बिटच्या रक्षणाकरिता वनरक्षक यांचे मुख्यालय असूनसुध्दा चौकीदारापासून वनरक्षक व अधिकारी हे कुणी ही मुख्यालयी राहत नसल्यामुळे गावकरी त्यांना वारंवार फोन करून लवकर पोहोचण्याची विनंती करीत होते. मात्र ते आरामात ९ वाजतानंतर पोहोचले. त्यांनी पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून जखमी निलगायीची मलमपट्टी करुन तिला बरी होईपर्यंत आपल्या देखरेखीखाली ठेवण्यासाठी सालेकसा क्षेत्राधिकारी यांच्या कार्यालयात मॅटेडोरनी नेले. विशेष उल्लेखनिय म्हणजे ही घायाळ निलगाय गाभन असल्याचे सांगितले जाते. (वार्ताहर)
भरकटलेल्या नीलगाईने घेतला वाड्यात आसरा
By admin | Updated: December 27, 2014 02:03 IST