गोंदिया : जिल्ह्यात विविध ठिकाणच्या अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे बालकांमध्ये कुपोषणाचे प्रमाण वाढत आहे. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच पालकमंत्र्यांनी जिल्हाभरातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांची पदे भरण्यास हिरवी झेंडी दिली आहे. सदर पदभरती १५ दिवसांच्या आत करण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. त्यासाठी पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार विशेष समिती तयार करण्यात आल्याची माहिती आहे. जिल्ह्यात कुपोषित बालकांचे प्रमाण पाहता त्यामागे अंगणवाडी सेविका व मदतनिसांची पदे रिक्त असणे हे मुख्य कारण असल्याचे मानले जाते. जिल्ह्यात गेल्या दीड वर्षापासून अंगणवाडी सेविकांची ३६ पदे, मदतनिसांची ५५ पदे व मिनी अंगणवाडी सेविकेचे एक पद रिक्त आहे. या पदभरतीसाठी अनेकदा प्रयत्न करण्यात आले. परंतु नेहमी ही पदभरती थंडबस्त्यात घातली गेली. आता या पदांच्या भरतीसाठी पालकमंत्र्यांनी कमिटी नेमून दिल्याचे व त्यासाठी नुकतेच अनेक समित्यांची नेमणूक केल्याची विश्वसनिय माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सदर पदांची त्वरीत येणार असल्याची माहिती आहे. गोंदिया तालुक्यात सेविका व मदतनिस मिळून सात पदे, तिरोडा तालुक्यात १६ पदे, गोरेगाव तालुक्यात एक पद, आमगाव तालुक्यात नऊ पदे, सालेकसा तालुक्यात सहा पदे, देवरी तालुक्यात १५ पदे, सडक/अर्जुनी तालुक्यात १३ पदे, अर्जुनी/मोरगाव तालुक्यात १९ पदे अंगणवाडी सेविका व मदतनिसांची भरण्यात येणार आहेत. अनेक दिवसांपासून रखडलेल्या या पदभरतीला राजकारणाचा दंश झाल्याची चर्चा होती. परंतु जिल्ह्यात कुपोषित बालकांचे प्रमाण पाहता ही पदभरती त्वरित घेणे अनिवार्य होते. लोकमतने याकडे लक्ष वेधल्यामुळे त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला.प्राप्त माहितीनुसार, ही पदभरती प्रक्रिया राबविण्यासाठी चार सदस्यीय विशेष समिती तयार करण्यात आली आहे. यात चार जणांचा समावेश राहील. त्या-त्या प्रकल्पांतर्गत समितीच्या अध्यक्षस्थानी पदाधिकारी किंवा अधिकारी महिला अध्यक्षपदी राहील. अशासकीय दोन, त्यामध्ये एक महिला पंचायत समिती सदस्य राहील. शिवाय तालुका आरोग्य अधिकारी व तालुका बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांचा समावेश राहणार आहे.प्रत्येक ब्लॉकनिहाय ही पदभरती स्वतंत्रपणे केली जाणार असून त्यासाठी जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे. तर गोंदियासाठी मुलाखतीसुद्धा आटोपल्या असल्याची माहिती उपमुख्य कार्यपालन अधिकारी साबळे यांनी लोकमतशी बोलताना दिली.
१५ दिवसांत होणार सेविका आणि मदतनिसांची पदभरती
By admin | Updated: August 5, 2014 23:30 IST