गोंदिया : राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदभरतीसाठी आता उमेदवारांना कोविडच्या पार्श्वभूमीवर ३० ऐवजी दोन वर्षाने वयोमर्यादेत वाढ करून कमाल मर्यादा ३२ करण्यात आली आहे. कोरोनामुळे विविध प्रकारच्या पदभरतीला विलंब झाला असल्याने ही वाढ करण्यात आली असून ती ३१ मार्च २०२२ पर्यंत होणाऱ्या पदभरतीसाठी लागू राहणार आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील ६९ अंगणवाडीतील भरतीप्रक्रिया थांबविण्याचे पत्र एकात्मिक बाल विकास योजनेने दिले आहे.
अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामध्ये ३० वर्षे वयाची अट होती. मात्र आता २ वर्षे वाढवून या जागांसाठी ३२ वर्षे वयोमर्यादा करण्यात आली आहे. जिल्ह्यात ४२ अंगणवाडी व २७ मिनी अंगणवाडी अशा ६९ अंगणवाड्यांची पदे भरली जाणार आहेत. याआधी नक्षलग्रस्त भागात झालेल्या भरतीच्या ठिकाणी जागा भरली जाणार नाही. यात, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील पाच अंगणवाडी व १ मिनी अंगणवाडी, देवरी तालुक्यातील १० अंगणवाडी व ३ मिनी अंगणवाडी, सडक-अर्जुनी तालुक्यातील सहा अंगणवाडी, सालेकसा तालुक्यातील ४ अंगणवाडी व २ मिनी अंगणवाडी, गोंदिया क्रमांक-१ मधील ४ अंगणवाडी व १ मिनी अंगणवाडी, गोंदिया क्रमांक-२ मधील ३ अंगणवाडी व १ मिनी अंगणवाडी, गोरेगाव तालुक्यातील २ अंगणवाडी व ४ मिनी अंगणवाडी, तिरोडा तालुक्यातील ५ अंगणवाडी व १५ मिनी अंगणवाडी, आमगाव तालुक्यातील ३ अंगणवाडींमध्ये भरती केली जाणार होती. त्यासाठी अर्ज सुद्धा मागविण्यात आले होते. परंतु नवी मुंबई येथील एकात्मिक बाल विकास योजनेने पत्र पाठवून राज्यभरातील अंगणवाडी सेविकांची भरती थांबविली आहे.