गोंदिया : बिल काढून देण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी तडजोडी अंती २० हजार रुपयांची लाच स्वीकारण्याचा प्रयत्न करणाऱ्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाच्या जिल्हा व्यवस्थापकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी (दि.२१) ही कारवाई करण्यात आली असून मनिष सुरेंद्र पटले असे लाचखोर व्यवस्थापकाचे नाव आहे.
तक्रारदार हे प्रिटींग प्रेस चालवित असून त्यांना जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष कार्यालयाकडून प्रपत्र-१ व प्रपत्र-२ प्रिटींग करून पुरवठ्याची ऑर्डर मिळाली होती. त्यानुसार, तक्रारदाराने मुदतीच्या आत साहित्य पुरवून त्याचे बिल कक्षात दिले. तक्रारदाराला ९४ हजार ४०० रुपयांचे बिल प्राप्त झाले नसल्याने त्यांनी व्यवस्थापक पटले याला विचारपूस केली असता, त्याने स्वत:करिता ३० हजार रुपये व प्रकल्प संचालकांकरिता २० हजार रुपये असे एकूण ५० हजार रुपयांची मागणी केली. यावर तक्रारदाराने २६ जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार नोंदविली होती.
त्या आधारे पथकाने पडताळणी केली असता, पटले यांनी तडजोडीअंती २० हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली होती. यावरून पटले विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ कलम ७ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.