गोंदिया : जिल्ह्यात एकूण २ लाख २३ हजार ४४७ रेशन कार्डधारक आहेत. मात्र, यापैकी केवळ ९५ टक्केच रेशन कार्डधारक नियमित धान्याची उचल करतात. त्यामुळे ५ टक्के धान्याची उचल न करणाऱ्या रेशन कार्डधारकांचा शोध घेऊन त्यामागील कारणांचा शोध घेतला जाणार आहे. या शोधमोहिमेदरम्यान सातत्याने तीन महिने स्वस्त धान्याची उचल न करणाऱ्यांचे व गावात वास्तव्यास नसणाऱ्यांचे रेशन कार्ड रद्द केले जाणार आहे. यासाठी १ फेब्रुवारीपासून शोधमोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. रेशन कार्डला आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. पण, अद्यापही हजारो रेशन कार्डधारकांनी ते लिंक केलेले नाही, तर रेशन कार्डधारक गावात अनेक वर्षांपासून वास्तव्यास नाहीत. मात्र, त्यांचे नाव रेशन कार्डवर आहे. काही रेशन कार्डधारकांचा मृत्यू झाला आहे; मात्र त्यांच्या नावाने रेशन कार्ड आहे. काही जण गावात वास्तव्यास नसताना देखील महिन्याकाठी त्यांच्या रेशन कार्डवर स्वस्त धान्याची उचल केली जात आहे. त्यामुळे आता या सर्व गोष्टींची चाचपणी केली जाणार असून, यात त्रुटी आढळणाऱ्या शिधापत्रिका रद्द केल्या जाणार आहेत. या शोधमोहिमेमुळे हजारो रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता पुरवठा विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.
............
अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती
शोधमोहिमेदरम्यान त्रुटी आढळणारे आणि नियमात न बसणारे रेशन कार्ड रद्द केले जाणार आहे. मात्र, एखाद्या रेशन कार्डधारकाला त्याचे कार्ड चुकीने रद्द केले असे वाटल्यास त्याला समितीकडे अपील करून दाद मागता येणार आहे. यासाठी अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित केली आहे. या समितीचे सचिव जिल्हा पुरवठा अधिकारी असून, सचिव जिल्हा पुरवठा अधिकारी हे आहेत तर सर्व तहसीलदार सदस्य आहेत. रद्द केलेल्या रेशन कार्डवर ही समिती निर्णय घेऊ शकते.
.......
तर रेशन कार्ड रद्द
तीन महिने स्वस्त धान्याची उचल न करणारे, गावात वास्तव्यास नसणारे, रेशन कार्डला आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. पण, अद्यापही हजारो रेशन कार्डधारकांनी ते लिंक केलेले नाही तर रेशन कार्डधारक गावात अनेक वर्षांपासून वास्तव्यास नाहीत; मात्र त्याचे नाव रेशन कार्डवर आहे, काही रेशन कार्डधारकांचा मृत्यू झाला आहे; मात्र त्यांच्या नावाने रेशनकार्ड आहे. विभक्त कुटुंबात राहत असूनही एकाच रेशन कार्डवर नावे आहेत. या सर्व गोष्टींची चाचपणी करून रेशन कार्डवरील नावे कमी केली जाणार असून, काही रेशन कार्ड रद्द केले जाणार आहेत.
......
या कारणाने रद्द होईल रेशन कार्ड
मृत रेशन कार्डधारक, गावात वास्तव्य नसणारे, केवायसी न झालेले, बोगस रेशन कार्डधारक, अनेक वर्षांपासून स्वस्त धान्याची उचल न करणाऱ्यांचे रेशन कार्ड रद्द केले जाणार आहे. ते रद्द करण्यापूर्वी सर्व गोष्टींची चाचपणी केली जाणार आहे.
.......
हे पुरावे आवश्यक
रहिवासी दाखला, आधार कार्ड, गावातील मतदार यादीत नाव, ग्रामपंचायतीचा दाखला, मालमत्ता कर पावती, केवायसी केल्याचे प्रमाणपत्र आदी पुरावे शिधापत्रिकेसाठी आवश्यक आहे.
.......
कोट :
जिल्ह्यात एकूण २ लाख २३ हजार रेशन कार्डधारक आहेत. पण, यापैकी केवळ ९५ टक्के रेशन कार्डधारक नियमित धान्याची उचल करतात, तर उर्वरित ५ टक्के शिधापत्रिकाधारक धान्याची उचल करीत नाहीत. त्यामुळे हयात आहेत किंवा नाहीत, या कारणांचा शोध या मोहिमेदरम्यान घेतला जाणार आहे.
- देवचंद वानखेडे, जिल्हा पुरवठा अधिकारी.