सिरपूरबांध : सध्या कोरोना महामारीने सर्वत्र धुमाकूळ घातला असून, या महामारीवर आळा घालण्याकरिता शासनातर्फे कडक लॉकडाऊन लावण्यात आले आहे. जनतेने घराबाहेर निघू नये असे आवाहन शासन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. यामुळे लोकांच्या हाताला काम नसल्यामुळे नागरिकांना जगणे कठीण होत चालले आहे. यातच प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे रेशनकार्डावरील नाव कमी झाल्यामुळे कार्डधारक स्वस्त धान्य मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे.
एका बाजूला शासनामार्फत प्रत्येक व्यक्तींना तीन किलो तांदूळ, तर दोन किलो गहू मोफत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. परंतु, रेशनकार्डधारकांना त्यांचा हक्काचा स्वस्त धान्य मिळत नसेल तर मोफत धान्य कसे मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सर्व प्रणाली ऑनलाईन असल्यामुळे कुठून नावे कमी झाले असे सांगता येत नसल्याचे तालुका प्रशासनाचे म्हणणे आहे. परंतु, प्रशासनाच्या चुकीमुळे परिसरातील बरेच लाभार्थी आपल्या हक्काच्या स्वस्त धान्य मिळण्यापासून वंचित आहेत. तालुका पुरवठा अधिकारी देवरी यांच्याशी संपर्क केला असता जिल्हा पुरवठा अधिकारी याबाबत सविस्तर माहिती देतील असे सांगितले. प्रशासनाच्या या चुकीमुळे दोन महिन्यांच्या स्वस्त धान्य मिळण्यापासून बरेच रेशनकार्डधारक वंचित आहेत.