नगर पंचायत निवडणूक : राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजपात होणार तिहेरी लढतगोंदिया : जिल्ह्यातील चारही नगर पंचायतींमध्ये जाहीर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी (दि.३०) तीनही प्रमुख पक्षांच्या नेते व उमेदवारांनी रॅली काढून मतदारांना आपल्याच पक्षाच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले. सायंकाळी ५ वाजता जाहीर प्रचार समाप्त झाला. १ नोव्हेंबरला चारही ठिकाणी मतदान होणार आहे.शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांनी चारही ठिकाणी रॅली काढली. शहरातील प्रमुख मार्गाने फिरत या पक्षांनी शक्तीप्रदर्शनही केले. काही ठिकाणी भाजप उमेदवारांचा जोर काहीसा कमी पडत असल्याचे या रॅलीवरून दिसत होते. भाजपच्या नेत्यांनी वर्षभर आपल्या सरकारने केलेल्या चांगल्या कामाचा गवगवा केला तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या सरकारने कसा अपेक्षाभंग केला हे दाखविण्याचा प्रयत्न केला.राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी घेतला मतदारांचा आशीर्वादराष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शुक्रवारी चारही नगर पंचायत क्षेत्रात आ.राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वात रॅली काढण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी मतदारांसोबत थेट संपर्क साधून आशीर्वाद घेतले. गोरेगाव येथे सकाळी ११ वाजता आ.राजेंद्र जैन, माजी आ.दिलीप बंसोड, म्हाडाचे माजी सभापती नरेश माहेश्वरी, पंचम बिसेन, तालुका अध्यक्ष केवल बघेले, जि.प.सदस्य ललीता चौरागडे यांच्या नेतृत्वात तसेच कुंदन कटारे, रजनी गौतम, सुरेश हर्षे, मनोज डोंगरे, सुखराम फुंडे, जीयालाल पंधरे, सुनीता मडावी, लक्ष्मण चंद्रिकापुरे, कैलाश डोंगरे, टीकाराम मेंढे, कमल बहेकार, पं.स.सभापती उषा किंदरले, किशोर पारधी यांच्या प्रमुख उपस्थिती रॅली काढण्यात आली.अर्जुनी मोरगाव येथे वार्ड क्र.१ मधील हनुमान मंदिराजवळून सकाळी ११.३० वाजता जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर, देवेंद्रनाथ चौबे, नामदेव डोंगरवार, किशोर तरोणे, यशवंत परशुरामकर, नारायण भेंडारकर यांचे नेतृत्वात रॅली काढण्यात आली. सडक अर्जुनी येथील जि.प.माध्यमिक शाळेजवळून दुपारी १२.३० वाजता काढलेल्या रॅलीत आ.राजेंद्र जैन, नरेश माहेश्वरी, जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर, रमेश चुऱ्हे, मनोहर चंद्रिकापुरे, हिरालाल चौव्हाण, बाबुराव कोरे यांच्या नेतृत्वात नगरभ्रमण केले. देवरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाजवळून दुपारी २ वाजता निघालेल्या रॅलीत आ.राजेंद्र जैन, कृ.उ.बा.स.सभापती रमेश ताराम, गोपाल तिवारी, भैय्यालाल चांदेवार, भास्कर धरमशहारे, दिलीप कुंभरे, सुजीत अग्रवाल, अंशुल अग्रवाल, केशव भुते, मंदिरा वालदे, सी.के. बिसेन, संजय दरवडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभाागी झाले. यावेळी राकाँच्या उमेदवारांनी नम्रपणे मतदारांना नगराच्या विकासासाठी राष्ट्रवादीला साथ देण्याचे आवाहन केले.सुटबूटवाल्या सरकारने शेतकऱ्यांना रडविले-अग्रवालप्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आ.गोपालदास अग्रवाल व आ.सुनील केदार यांनी अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी येथे प्रचार रॅली काढून नागरिकांना काँग्रेसच्या उमेदवारांसाठी मतदान करण्याचे आवाहन केले. अर्जुनी मोरगाव येथे बौद्ध विहारापासून भरतटोलीपर्यंत शहरातून भ्रमण केले. सडक अर्जुनी येथे शिव मंदिरापासून संपूर्ण शहरात फिरून नागरिकांचे आशीर्वाद घेतले. यावेळी मार्गदर्शन करताना राज्य लोकलेखा समितीचे सभापती आ.गोपालदास अग्रवाल यांनी लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे विकास कार्ये दूर असल्याचे सांगत सुटबूटवाल्या सरकारने शेतकऱ्यांना रडविले. त्यांचा हिशेब चुकता करा, असे आवाहन केले. यावेळी सावनेरचे आमदार सुनील केदार यांनीही मार्गदर्शन केले. आ.अग्रवाल यांनी गोंदिया जिल्ह्यात विकासाला नवीन आयाम दिला असे ते म्हणाले. यावेळी प्रामुख्याने आ.रामरतन राऊत, जि.प.अध्यक्ष उषाताई मेंढे, पुरूषोत्तम कटरे, शिक्षण सभापती पी.जी.कटरे, महिला बालकल्याण सभापती विमल नागपुरे, जिल्हा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष राधेलाल पटले यांच्यासह ठिकठिकाणचे अनेक काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)
रॅलींनी दुमदुमला शेवटचा दिवस
By admin | Updated: October 31, 2015 02:30 IST