१४ जण जखमी : विवाह आटोपून परत येताना झाला अपघातगोंदिया : तिरोडा तालुक्याच्या लेंडीटोला (इंदोरा खुर्द) गावाजवळ लग्नावरून परतणाऱ्या वऱ्हाडाची काळी-पिवळी गाडी झाडावर धडकून उलटली. त्यात १४ जण जखमी झाले. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना उपचारासाठी गोंदिया मेडिकल कॉलेजमध्ये हलविण्यात आले. ही घटना बुधवारी (दि.५) रात्री १०.१५ वाजतादरम्यान लेंडीटोला येथून एक किमी अंतरावर घडली. प्राप्त माहितीनुसार, इंदोर खुर्द येथील रहिवासी व्यंकटेश्वर दसाराम राऊत (४०) यांच्या भावाचा विवाह ५ एप्रिलला गोरेगाव तालुक्याच्या पूरगाव येथे झाला. विवाह समारंभ आटोपल्यानंतर हे वऱ्हाडी काळी-पिवळी वाहनाने (एमएच ३६/३१४४) परत लेंडीटोलासाठी निघाले होते. तीव्र गतीने जाणारे सदर वाहन एका वळणावर अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या वृक्षावर धडकले व उलटले. त्यामुळे काळी-पिवळीमध्ये बसलेले १४ जण जखमी झाले. त्यापैकी काही जखमींना तिरोडा उपजिल्हा रूग्णालयात तर गंभीर जखमींना गोंदिया मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले.जखमींमध्ये इंदोरा येथील रहिवासी लक्ष्मण राऊत, कैलाश सूर्यवंशी, देविदास शहारे, बाजीराव लाडे, ईश्वर शहारे, अशोक उके, मधू उके, तेढवा येथील पवन नेवारे, रामाटोला येथील मौसम चौधरी यांचा समावेश आहे. तिरोडा पोलिसांनी काळी-पिवळीचा चालक कालू भदाडे (३५) रा. धामनेवाडा याच्यावर भादंविच्या कलम २७९, ३३७, ३३८ व मोटार वाहन कायद्याच्या सहकलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)
वरातीची काळी-पिवळी झाडाला धडकून उलटली
By admin | Updated: April 7, 2017 01:26 IST