नागरिकांची तारांबळ : आठवडी बाजारात मोठे नुकसान सालेकसा : सोमवारला सायंकाळी येथील आठवडी बाजारात खरेदी-विक्री जोरात सुरू असताना अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने धडक दिली. यामुळे बाजारात एकच धावपळ माजली. रस्त्यावरील दुकानातील विविध वस्तू पावसात सापडल्याने लाखो रुपयांचे नुकसान होताना प्रत्यक्ष पहावयास मिळाले. ८ जून रोजी मृग नक्षत्राला सुरूवात झाली. या दिवसापासून पावसाळा सुरू झाल्याने मानले जाते. सोमवार दिवसा तीव्र उष्णता असतांना सायकाळी ५ वाजता वातावरणात अचानक बदल झाला व पाहता पाहता वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपणे सुरू केले. त्यामुळे लोकांना धावपळीत आसरा शोधावा लागला. येथील आठवडी बाजारात दुकानदारांना आपली दुकाने बंद करण्याचाही वेळ मिळाला नाही. त्यांना आपली दुकाने उघड्यावर सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला. अनेक दुकानावरील कापडी छत वाऱ्याच्या फटकाऱ्याने उद्ध्वस्त होऊन गेली. रस्त्यावर पाऊस जमल्याने रस्त्यावर थाटलेल्या दुकानांतील वस्तुंचे मोठे नुकसान झाले. पावसात सापडल्याने भाज्या, फळे, मिठाई, सौंदर्य प्रसाधने इत्यादी विविध दुकानातील वस्तु रस्त्यावर विखुरली व नासधुस झाली. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान होताना दिसले. वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील अनेक घरातील छताचे पत्रे, कवेलु सुध्दा उडाली. त्यामुळे अनेक लोकांच्या घरात सुध्दा पाणी घुसले व अनेक वस्तुंचे नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडे तुटून आणि उखडून खाली पडली. काही ठिकाणी झाडे मकानावर पडल्यामुळे अनेक मकानांचे नुकसान झाले आहे. (प्रतिनिधी)
वादळासह पावसाने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2015 00:45 IST