आमगाव : वन परिक्षेत्रांतर्गत वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्या टोळींचा वाढता प्रभाव वन्यजीवांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. विद्युत शॉकने रानडुकराची शिकार करून त्याची विल्हेवाट लावणाऱ्या टोळीला आमगावच्या वनविभागाने पकडले. आमगाव तालुक्यात वाढत्या वनक्षेत्रामुळे वन्य प्राण्यांना जंगलात वापरण्यासाठी वाव मिळत आहे. परंतु वाढत्या वन्यप्राण्यांच्या आसऱ्याला शिकाऱ्यांच्या हालचालीही वाढल्या आहेत. तालुक्यातील सावंगी येथे शिकाऱ्यांनी वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी विद्युत तारा शेतशिवारात टाकल्या होत्या. २० सप्टेंबरला याच विद्युत तारांमध्ये अडकून रानडुकराची शिकार करण्यात आली. शिकाऱ्यांनी मारलेल्या वन्य प्राण्यांची माहिती कुणाला मिळू नये यासाठी त्याची विक्री सालेकसा तालुक्यातील मुंडीपार येथे केली. शिकाऱ्यांनी विकलेल्या वन्यप्राण्यांची विल्हेवाट करुन त्याचे मटन तयार करताना आरोपी राजेश रुपलाल उपराडे (२७), भैयालाल कोहतू वाघमारे (६०) दोन्ही रा. मुंडीपार यांना आमगाव वनविभागातील वनरक्षक एस.एम. पवार, वनरक्षक एस.जी. माहुरे यांच्या पथकाने धाड घालून अटक केली. यावेळी उपस्थित सहा शिकाऱ्यांनी पळ काढला. वनविभागातील पथकाने वन्यप्राण्यांचे मांस हस्तगत केले. डॉ. बी.आर. हेडाऊ यांनी उत्तरीय तपासणी करून मांस जमीनीत पुरण्यात आले. सदर प्रकरणात आरोपी राजेश रुपलाल उपराडे, भैयालाल वाघमारे यांच्याविरुद्ध वन्यप्राणी शिकार प्रकरणी वन्यजीव कायदा १९७२ चे कलम २ (१६), २ (२०), (३५), ९ (३९) (५१), १८६० चे कायदा ४२९ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.
विद्युत शॉक देऊन रानडुकराची शिकार
By admin | Updated: September 22, 2014 23:21 IST