आमचं गाव, आमचा विकास : निधीचे नियोजन गावातच कराबोंडगावदेवी : राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागातर्फे ग्रामपंचायतीच्या विकास आराखड्यासंदभातील ‘आमचं गाव आमचा विकास’ या उपक्रमाची ग्रामस्थांमध्ये जागृती करण्यात आली. गावाच्या सर्वांगिण विकास आराखड्यात सहभागी होण्यासाठी ग्राम संसाधन गटामार्फत गावातील मुख्य मार्गावरुन मशाल रॅली काढण्यात आली.गावातील ग्रामपंचायतींना सक्षम करण्यासाठी चौदाव्या वित्त आयोगामार्फत गावात येणाऱ्या निधीचा गावकऱ्यांच्या सहकार्यांने गावातच नियोजन व्हावे, सलग ५ वर्ष लोकसंख्येच्या प्रमाणात मिळणाऱ्या निधीचे ग्रामपंचायत स्तरावर नियोजन करुन गावाचा विकास साधण्यासाठी ‘आमचं गाव, आमचा विकास’ या उपक्रमांतर्गत मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले.ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच राधेश्याम झोळे यांच्या हस्ते मशाल पेटविण्यात आली. यावेळी प्रविण प्रशिक्षक बाळकृष्ण सोनवाने, ग्रामसेवक एल.एन. ब्राम्हणकर उपस्थितीत होते. ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्राम संसाधन गट, तंमुस पदाधिकारी, अंगणवाडी सेविका, आरोग्य अधिकारी, कृषी सहाय्यक, जि.प. शाळेचे शिक्षक, स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी, गावातील सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. गावातील प्रमुख मार्गावरुन मशाल रॅली काढून गावकऱ्यांना ‘आमचं गाव, आमचा विकास’ या उपक्रमाबद्दल जनजागृती करण्यात आली. गावामधून रॅलीचे ग्रामपंचायत कार्यालयात विसर्जन करण्यात आले. सभागृहात झालेल्या बैठकीत प्रविण प्रशिक्षण सोनवाने यांनी लोक सहभागीय नियोजन संबंधी माहिती विषद केली. ग्रामसेवक एल.एन. ब्राम्हणकर यांनी मशाल रॅलीमध्ये सहभागी झालेल्यांचे आभार मानले. पंचवार्षिक कृती आराखडा तयार करण्यासाठी तीन दिवसीय कार्यशाळेत उपस्थित राहण्याचे आवाहन केले. (वार्ताहर)
मशाल रॅलीने जनजागृती
By admin | Updated: July 9, 2016 02:03 IST