बिरसी फाटा : तिरोडा आगारात मागील महिनाभरापासून पिण्याचे व वापरासाठी पाणी नसल्याने येथील प्रवासी व कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. मात्र याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने पाण्याची व्यवस्था करा, अन्यथा प्रवाशांसोबत तीव्र आंदोलन करू, असा इशारा अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेचे अध्यक्ष नितेश खोब्रागडे यांनी दिला आहे. तिरोडा बसस्थानक व आगारात सुमारे एक महिन्यापासून पाणी नसल्यामुळे बसस्थानक व आगारातील शौचालय बंद आहे. त्यामुळे येथील प्रवासी व कर्मचाऱ्यांना पिण्याचे पाणी मिळत नसून सोबतच स्वच्छतागृहाअभावी अडचण होत आहे. यात विशेषकरून दररोज बसने प्रवास करणाऱ्या महिलांना प्रसाधनगृह बंद असल्याने अधिकच त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा नाइलाजास्तव उघड्यावरच लघुशंकेसाठी जावे लागत असल्याने लज्जास्पद प्रकार बसस्थानक परिसरात घडत आहे. याबाबत काही महिलांनी ग्राहक कल्याण परिषदेकडे तक्रार केल्यावरून अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेचे तालुकाध्यक्ष नितेश खोब्रागडे यांनी प्रवाशांसोबत तिरोडा बसस्थानकात एटीएस तिडके यांना निवेदन दिले. तसेच पाण्याची व्यवस्था न झाल्यास प्रवाशांसोबत आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.
बसस्थानकावर पाण्याची सुविधा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:16 IST