तिरोडा : तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. उपजिल्हा रुग्णालयातील बेड्स फुल्ल झाले आहेत. ऑक़्सिजन, व्हेंटिलेटर व कोरोनावरील औषधांचा तुटवडा कायम आहे. रुग्णांची सोय होत नसल्याने त्यांना रेफर टू गोंदिया केले जात आहे. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी तालुक्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाने कोविड रुग्णांसाठी पुरेशा प्रमाणात सोयी उपलब्ध करून द्याव्या, अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जनक्रांती विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष दिलीप बन्सोड यांनी दिला आहे.
तिरोडा तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासकीय रुग्णालयात व खाजगी रुग्णालयात रुग्णासाठी पाहिजेत त्या प्रमाणात व्यवस्था नाही. त्यामुळे अनेक रुग्ण दररोज दगावत आहेत. गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया तालुका सोडता तिरोडा तालुका हा हाॅटस्पाॅट झाला आहे; परंतु आरोग्य सुविधा उपलब्ध नाही. गोंदिया शहरातच खाजगी व शासकीय रुग्णालयात पूर्णपणे आरोग्य सुविधा दिसत आहेत. जिल्हा प्रशासन फक्त गोंदिया शहरात लक्ष घालत आहे. त्यामुळे तिरोडा तालुक्यामध्ये आरोग्याच्या दृष्टीने पाहिजे त्या सोयी सुविधा अद्यापही उपलब्ध झाल्या नाहीत. तरी जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांनी तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात आरोग्यविषयक सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी दिलीप बन्सोड माजी यांनी दिला आहे.