गोंदिया : नगर परिषदेने थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी धडक मोहीम सुरू केली आहे. याच मोहिमेंतर्गत बुधवारी नगर परिषदेच्या मालमत्ता कर वसुुली पथकाने २१ लाख रुपयाचा मालमत्ता कर थकविल्याप्रकरणी शहरातील पाच व्यावसायिक प्रतिष्ठाने सील केली. मोहिमेदरम्यान दोन मालमत्ताधारकांनी त्वरित कराचा भरणा केल्याने त्यांच्यावरील कारवाई टाळण्यात आली.
मालमत्ता कर वसुली पथकाने बुधवारी शहरातील जयस्तंभ चौकातील बसस्थानकाजवळील पंकज अग्रवाल यांच्या व्यावसायिक प्रतिष्ठानावर २०१३ पासून १ लाख ३९ हजार ३३४ रुपयाचा मालमत्ता कर थकीत होता. गांधी प्रतिमा चौकातील गोंदिया सहकारी शेतकरी खरेदी विक्री यांचे कार्यालय आणि याच इमारतीतील तीन दुकाने यांच्याकडे २००५ पासून १५ लाख ५५ हजार ३७५ मालमत्ता कर थकीत होता. जयस्तंभ चाैकातील गजानन उके यांच्या दुकानावर १९९३ पासून मालमत्ता कर थकीत होता. जयस्तंभ चौकातील गुरुप्रीत इलेक्ट्रिकल्स व गुरुनानक वाॅर्ड येथील श्री कार्ड यांच्याकडे २००६ पासून मालमत्ता कर थकीत होता. त्यांनी या मालमत्ता कराचा भरणा न केल्याने नगर परिषदेच्या भरारी पथकाने त्यांची व्यावसायिक प्रतिष्ठाने सील केली.