अर्जुनी मोरगाव : पालकमंत्री अनिल देशमुख यांनी घेतलेल्या जनता दरबारात १ फेब्रुवारीपासून शहरात रोजगार हमीची कामे सुरू करण्याचे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिले. मात्र, अजूनपर्यंत कामे सुरू झाली नाहीत. मुख्याधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा; अन्यथा मजुरांसह आमरण उपोषण करू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष आर.के. जांभूळकर यांनी दिला आहे.
नगरपंचायत अस्तित्वात आल्यापासून शहरात रोजगार हमीची कामे सुरू झाली नाहीत. वारंवार वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्यात आले. मात्र, त्यांना केराची टोपलीच दाखविण्यात आली. २७ जाने. रोजी जनता दरबाराचे औचित्य साधून जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल देशमुख, राज्याचे रोजगार हमी योजना समितीचे अध्यक्ष मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हाधिकारी दीपक मीना यांच्या समक्ष हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्याधिकारी शिल्पाराणी जाधव यांनी १ फेब्रुवारीपर्यंत कामे सुरू करण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. स्थानिक नगरपंचायतमध्ये कामाच्या मागणीच्या संबंधाने एक महिन्यापासून मजुरांनी नमुना ४ भरून कामाची मागणी केली आहे. मात्र, अद्यापही मजुरांच्या हाताला कामे देण्यात आली नाहीत. परिणामी, नगरपंचायत क्षेत्राचा विकास खुंटला आहे. मजुरांना कामे नसल्याने त्यांच्यावर उपासमारीचे संकट ओढवले आहे. महाराष्ट्र राज्य रोजगार हमी अधिनियम २००५ नुसार मजुरांना बेकारी भत्ता देण्यात यावा, पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अवहेलना करणाऱ्या मुख्याधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात यावे; अन्यथा मजुरांसोबत आमरण उपोषण करण्याचे लेखी पत्र राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उपविभागीय अधिकारी कार्यालयाला देण्यात आले.