१०० टक्के निकाल नाही : माताटोली शाळेचा सर्वात कमी ५६ टक्के निकालगोंदिया : पालिकेच्या शाळांमधील पटसंख्येची घरसण होऊन खाजगी शाळा पालिकेच्या शाळांवर वरचढ ठरत आहेत. पालिकेच्या शाळांची यामुळे अत्यंत दयनीय स्थिती निर्माण झाली आहे. पटसंख्येच्या बाबतीत खाजगी शाळा पालिकेच्या शाळांवर मात करीत असतानाच आता निकालातही खाजगी शाळा पालिकेच्या शाळांवर भारी पडत आहेत. यंदा दहावीच्या निकालात शहरातील खाजगी शाला १०० टक्के निकाल देत असतानाच मात्र पालिकेच्या एकाही शाळेने १०० टक्के निकालाचा टप्पा गाठलेला नाही. शहरातील खाजगी शाळा विद्यार्थ्यांनी खचाखच भरत असतानाच पालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गळती दिसून येते. विद्यार्थी पटसंख्येअभावी पालिकेला आपल्या शाळा बंद कराव्या लागल्या आहेत. मात्र एवढे होऊनही पालिकेच्या शाळांत काही बदल झालेला नाही. तोच कारभार व तीच पद्धती आजही पालिकेच्या शाळांत राबविली जात आहे. दहावीच्या जाहीर झालेल्या निकालात शहरातील साकेत पब्लीक स्कूल, निर्मल स्कूल, विवेक मंदिर, गणेशन स्कूल, जानकीदेवी चौरागडे शाळा, मिलीटरी स्कूल, राजस्थान शाळा, संस्कार हायस्कूल आदिंनी १०० टक्के निकाल दिला. तर दुसरीकडे मात्र पालिकेच्या पाच पैकी एकाही शाळेचा निकाल १०० टक्के लागलेला नाही. आकडेवारीसह बघितले असता मनोहर म्युनिसिपल लोअर सेकंडरी गोविंदपूर शाळेतील १२५ विद्यार्थ्यांनी दहावीची परिक्षा दिली असून त्यातील ९० विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने शाळेचा ७२ टक्के निकाल लागला आहे. रामनगर म्युनिसिपल शाळेतून ३९ विद्यार्थ्यांनी दहावीची परिक्षा दिली असून त्यातील २८ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने शाळेचा ६५ टक्के निकाल लागला आहे. मनोहर म्युनिसिपल हायर सेकंडरी शाळेतून १६९ विद्यार्थ्यांनी दहावीची परिक्षा दिली असून त्यातील १४० विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने शाळेचा ८३ टक्के निकाल लागला आहे. एस.एस.गर्ल्स स्कूलमधून १०८ विद्यार्थीनींनी दहावीची परिक्षा दिली असून त्यातून ८५ विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्याने शाळेचा ८० टक्के निकाल लागला आहे . तर माताटोली शाळेतून ४१ विद्यार्थ्यांनी दहावीची परिक्षा दिली असून त्यातील २३ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने या शाळेचा सर्वात कमी ५६ टक्के निकाल लागला आहे. वरील आकडेवारी बघता पालिकेच्या शाळांवर शहरातील खाजगी शाळा १०० टक्के निकाल देऊन वरचढ ठरत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. (शहर प्रतिनिधी)
खाजगी शाळा पालिकेच्या शाळांवर वरचढ
By admin | Updated: June 23, 2014 23:55 IST