गोंदिया : राज्य शासनाने २८ आॅगस्ट २०१५ रोजी काढलेल्या अध्यादेशाचा निषेध करीत मुख्याध्यापक संघाने जिल्हा परिषदेसमोर शनिवारी एक दिवसीय धरणे आंदोलन केले. या आंदोलनात जिल्ह्यातील मुख्याध्यापक सहभागी झाले होते. मुख्याध्यापकांच्या म्हणण्यानुसार, बालकांचा मोफत शिक्षणाचा अधिकार कायद्याची अंमलबजावणी राज्याच्या शिक्षण विभागाकडे असल्याने या कायद्याचा आपल्या सोयीचा अर्थ लावून शासन संभ्रम निर्माण करीत आहे. २८ आॅगस्ट २०१५ रोजी काढलेला अध्यादेश असाच चुकीचा आहे. या अध्यादेशाच्या विरोधात शिक्षण संस्था, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. सदर शासन निर्णय रद्द करावा, १०० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे मुख्याध्यापकपद अतिरक्त होत आहे. त्यामुळे शाळा, तुकड्या किंवा पटसंख्येच्या आधारावर मुख्याध्यापक पद नसावे, चुकीची माहिती देणाऱ्या मुख्याध्यापकावर भादंविच्या कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल केला जाईल असे म्हटले आहे. ती कलमे कमी करण्याचे शिक्षणमंत्र्यांनी म्हटले परंतू तसे झाले नाही. शिक्षणमंत्र्यांनी शिक्षकांना वापरलेले अपमानजनक शब्द मागे घेण्यात यावे, मुख्याध्यापकांना सुधारित वेतनश्रेणी लागू करावी, अशा विविध मागण्यांचा समावेश होता. या आंदोलनात अध्यक्ष प्रकाश पटेल, कार्यवाह महेंद्र मेश्राम, धनराज हुकरे, पी.एन. नागदेवे, आर. एफ. बेग, एस. डब्ल्यू. श्रीरामे, सी.पी.वंजारी, व्ही.झेड.गिऱ्हेपुंजे, डी.सी.रहांगडाले, डी.पी. रहांगडाले, एस.एल. शहारे, प्रमोद सचदेव, व्ही.टी. पटले, आर.टी.नाकाडे, पी.सी. रहांगडाले, जी.एस.राऊत, डी.बी.गेडाम, बी.पी. बिसेन, जे. आर कोल्हारे, ओ. आर देशमुख, बी.डी. कुरसुंगे व इतरांचा समावेश होता. (तालुका प्रतिनिधी)सौर ऊर्जेवरील दिव्यांची मागणीसडक-अर्जुनी : ढाकणी ग्रामपंचायतीला सौर ऊर्जेवरील दिवे उपलब्ध झाले आहेत. मात्र येथील शाहू-फुले वार्डात सदर दिवे लावण्यात आले नाही. या वार्डात सदर दिवे लावण्याची मागणी युवराज डोंगरे, धनराज मोहनकर आदींनी केली.
मुख्याध्यापकांचे धरणे आंदोलन
By admin | Updated: September 20, 2015 02:13 IST