सीसीटीव्हीची व्यवस्था : ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी मोजक्याच ठिकाणी ध्वनिक्षेपकअर्जुनी-मोरगाव : महाशिवरात्री पर्वाच्या निमित्ताने प्रतापगड येथील यात्रा व ख्वाजा उस्मानगणी हारूणी उर्स संदर्भात प्रशासकीय यंत्रणेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व गोष्टींचा आढावा घेण्यात आला आहे.गेल्या दि.२७ ला राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री तथा पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अनेक सूचना करण्यात आल्या होत्या. यात्रेत दुर्घटना व हानी टाळण्यासाठी मुख्य मंदिर, न्हाणी, गावातील शिवमंदिर, दर्गा व पहिली पायरी अशा पाच ठिकाणी सीसीटीव्हीची व्यवस्था तालुका प्रशासनाद्वारे केली जाणार आहे. यात्रेमध्ये वनवणवा व आग लागू नये यासाठी वनविभागामार्फत ब्लोअर मशीनची व्यवस्था केली जाणार आहे. ६ ते १५ मार्चपर्यंत यात्रास्थळी वीज भारनियमन केले जाऊ नये. १२ मार्चपर्यंत इटियाडोह धरणाच्या कालव्यातून ५० ते १०० क्युसेक पाणी सोडले जाणार आहे. न्हाणी, मंदिर, गावातील शिवमंदिर, महाप्रसादाचे ठिकाण व दर्गा या ठिकाणावरच ध्वनीक्षेपण व्यवस्थेची परवानगी दिली जाणार आहे. यात्रेच्या काळात वीज पुरवठा सुरळीत राहण्याच्या दृष्टीने दोन अतिरीक्त लाईनमनची नियुक्ती केली जाणार आहे. दिवाबत्ती विद्युत खांबाचे खाली कोणत्याही ज्वलनशील वस्तू राहणार नाही याची खबरदारी विद्युत विभागाने घेण्याचे निर्देश देण्यात आले. वाहन पार्र्कींगसाठी वनविभागातर्फे प्रतापगड-अर्जुनी-मोरगाव मार्ग, प्रतापगड-तिबेट मार्ग, प्रतापगड-कढोली मार्ग व एसटी महामंडळासाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यात्रा ठिकाणी पाणी टंचाई भासू नये यासाठी सा.बां. विभागातर्फे किमान पाच दिवस सतत पाण्याच्या टॅकरची व्यवस्था केली जाणार आहे. पंचायत समितीच्या वतीने १५ तात्पुरत्या मूत्रिघरांची व्यवस्था ठिकठिकाणी केली जाणार आहे. प्रतापगड ग्रापंचायतच्या वतीने भाविकांकरिता पाच ठिकाणी प्रत्येकी १ हजार लिटर क्षमतेच्या पाण्याचा टाकी उपलब्ध करून पाणपोईची व्यवस्था केली जाणार आहे. बसस्थानक, दर्गा व मंदिर मार्गावर १०० पथदिव्यांची व्यवस्था राहील. यात्रेकरूंसाठी जागोजागी तात्पुरता स्वरूपाच्या शौचालयाची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले. यात्रेकरिता प्रतापगड येथील रॉकेलचा पुरवठा साठा २०० लिटरने वाढवून द्याव्या, असे सूचविण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)
प्रतापगड यात्रेची तयारी जोरात
By admin | Updated: March 6, 2016 01:34 IST