तिरोडा : तालुक्यातील घरकुल लाभार्थींना त्वरित रेती उपलब्ध करून देण्यात यावी, धडक सिंचन विहीर योजनेंतर्गत लाभार्थींना त्वरित अनुदान देण्यात यावे यासह अन्य मागण्यांना घेऊन प्रशासनाला जागे करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सोमवारी (दि.८) मुंडण व डफरी बजाओ प्रशासन जगाओ आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने घरकुल लाभार्थींना त्वरित रेती उपलब्ध करून देण्यात यावी अन्यथा या विरोधात मुंडण आंदाेलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र प्रशासनाने याची दखल घेतल्याने प्रहारच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर मुंडण करून प्रशासनाच्या दप्तर दिरंगाईचा निषेध केला. यावेळी आठ ते दहा कार्यकर्त्यांनी मुंडण केले. यानंतर विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. निवेदनातून धडक सिंचन विहीर योजनेच्या लाभार्थींना त्वरित अनुदान देण्यात यावे, विद्युत धक्क्याने जनावरे दगावलेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, तिरोडा शहरातील महात्मा फुले वॉर्डातील घरकुल लाभार्थींना जमिनीचे पट्टे त्वरित द्यावे, तिरोडा शहरातील ई-रिक्षाचालकांसाठी स्टॅण्डसाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी. घरकुलाचे प्रपत्र डमध्ये ग्रामपंचायत मागणीनुसार सुटलेली नावे ऑनलाइन करण्यात यावी. नगरेगांतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील कामे व वैयक्तिक लाभाच्या योजनेचे अंदाजपत्रक मागणीनुसार आठ दिवसात तयार करून देण्यात यावे तसेच कामाचे मस्टर त्वरित काढण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश होता. हे आंदोलन जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर, प्रदीप नशिने, युवराज रेवतकर, भाऊरावर चोपकर, परमेश्वर गौतम, शकील सालोकर, आभास चोपकार, निशांत बडोले, रंगलाल मारबदे, रमेश साठवणे यांचा समावेश होता.
......
दोन दिवसात रेती उपलब्ध करून देणार
घरकुल लाभार्थींना रेती मिळत नसल्याचे घरकुलांचे बांधकाम रखडले आहे. त्यामुळे लाभार्थींची परवड होत आहे. याकडेच प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रहारने मुंडण आंदोलन करून लक्ष वेधल्यानंतर तहसीलदारांनी उपजिल्हाधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. यानंतर त्यांनी दोन दिवसात रेती उपलब्ध करून देण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
......