गुन्हा दाखल करण्याची मागणी : सेवानिवृत्तीपूर्वी मुलीच्या नोकरीचा ठरावपरसवाडा : तिरोडा तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था गराडा व ठाणेगाव या संस्थेचे गटसचिव बी.डी. ठाकरे हे कारभार सांभाळत आहेत. याशिवाय इतर चार संस्थेचा कारभार त्यांच्याकडे आहे. त्यांचा सेवानिवृत्ती कार्यकाल ३१ डिसेंबर २०१६ ला होत आहे. त्यांनी सेवानिवृत्ती होण्याच्या आधीच संचालक मंडळाला माहिती न करता विषय पत्रिकेवर पदभरतीचा विषय न लिहिता आपल्या मर्जीने मुलगी पपीता बाबुराव ठाकरेच्या नावाचा बोगस ठराव पारित केला. सदर ठराव एकाच संस्थेत नव्हे तर दोन्ही संस्थेत पारित केल्याचे उघडकीस आले. या प्रकाराची कुणकुण काही संचालकांना लागताच त्यांनी संस्थेत मागील कार्यवृत्त वाचून बघितले असता ठराव लिहिले व पारित झालेले आढळले. लगेच अध्यक्ष गराडा गजानन बारापात्रे व नवेगाव अध्यक्ष नानू कटरे यांना विचारण्यात आले. त्यांनीसुद्धा नकार दिला. पण प्रोसींडीग बुकमध्ये लिहिले असल्याचे संचालकांनी निदर्शनास आणूण दिले. बाबुराव दिना ठाकरे यांना सेवा सहकारी संस्थेत राहून बोगस कामे करण्याची सवयच पडली असल्याचे बोलले जाते. त्यांच्याकडे ठाणेगाव, मेंढा, मलपुरी, गराडा, चिखली, सातोना या संस्थेचा कार्यभार आहे. संस्थेत पदभरतीचे अधिकार सहायक निबंधक व गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकच्या शिफारशीनुसार होत असतात. निबंधक यांनी पद भरतीची मंजुरी दिलीच नाही. त्यांच्याकडे तसा संस्थेचा प्रस्ताव नाही. सेवानिवृत्त होण्याच्या आधीच स्वत: गटसचिव ठाकरे यांनी आपल्या मुलीचे नाव ठरावमध्ये कुणालाही न सांगता लिहिले. सहकार विभागाचे नियम धाब्यावर बसवून ठाकरे यांनी अवैध मालमत्ता जमवून तिरोडा सहकार नगरात एक रस्त्याच्या जवळपास घर बनविले. आपल्या राहत्या गावी बेरडीपार येथे अवैध जमीन मालमत्ता तयार केली असून त्यांच्या बोगस ठराव, नियुक्ती प्रकरण, फौजदारी गुन्हा व मालमत्तेची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची मागणी संचालक अंकुश खोब्रागडे, सुनील बारापात्रे, ज्ञानेश्वर मेश्राम, श्रीराम साठवणे, कमल पाटील, राजकुमार फटींग, सहादेव यांनी सहायक निबंधक तिरोडा गोंदिया जिल्हा यांच्याकडे केली आहे. त्वरित निलबंनाच्या कारवाईची मागणी केली असून न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. गावात काही घटना शेतकऱ्यांकडून झाल्यास संबंधित प्रशासन जवाबदार राहील, याबाबत लेखी सूचना पण दिल्या आहेत. (वार्ताहर)
गटसचिव व अध्यक्षांनी केला पदाचा दुरुपयोग
By admin | Updated: November 9, 2016 01:46 IST