गोंदिया : पोंगेझरा तीर्थक्षेत्र गोंदियावरून ३० कि.मी. अंतरावर असून गोरेगाव तालुक्यातील प्राचिन शिवमंदिर आहे. येथे स्वयंभू गायमूख असल्याने या तीर्थक्षेत्राला विशेष महत्व आहे. या तिर्थक्षेत्रात महर्षी मुक्त संत मुक्तानंद स्वामी जगदगुरू रामजी महाराज अयोध्या यांनी तपश्चर्या केली होती. अनेक संत महात्मांना येथे अलौकिक सिद्धी आत्मज्ञान प्राप्त झाले असून हे स्थळ संतांची तपोभूमी म्हणूनही प्रसिद्ध आहे. आजही भारतातील अनेक संत या परिसरात आल्यावर पोंगेझराचे दर्शन आवर्जून घेतात. भगवान श्रीराम प्रभू यांनी जगन्नाथपुरीवरून रामटेककडे जाताना एक दिवस पोंगेझरा (दंडकारण्य) येथे विश्रांती घेतली होती, अशी मानता आहे.प्राचीन काळी हे मंदिर गोंड राजा करणशाहा यांचे कुलदैवत होते. त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. हे मंदिर मुगलकालीन आहे. राजा आपली सर्व संपत्ती या मंदिरात ठेवत असत, असे सांगितले जाते. राजाचे सैन्य या मंदिराची रक्षा करत होते. म्हणून त्यांच्या मूर्ती मंदिराजवळ ठेवलेल्या आहेत. जवळच करणशाहा राजाचा महाल आहे. काही काळापूर्वी येथे आलेबेदर नावाचे गाव होते. ते आरा रिठी आलेबेदर होऊन बोंडुंदा गावाला समाविष्ट करण्यात आले आहे. तिर्थक्षेत्र पोंगेझरा संस्थानचे प्रमुख बोळुंदा जमिनदारांच्या घराण्यातील आहे. जमीनदारीत विभाजन झाल्यावर तिरखेडी व हिरडामाली जमिनदारी बरोबर त्या क्षेत्रात महादेवाचे मंदिर प्रस्थापित करुन त्यांनाही पोंगेझरा म्हणून नाव देण्यात आले. पोंगेझरा मंदिर बोळुंदा, तिरखेडी आणि हिरडामाली अशा ठिकाणी प्रस्थापित होऊन जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धेचे ठिकाण आहे. प्राचीन काळापासून या मंदिराची ख्यातील असून येथे भाविक मोठ्या संख्येने येतात.प्राचीन काळापासून इथे भाविकांचे सर्व नवस पावल्यामुळे नवसाला नंदी कबूलले जातात. हे नंदी त्यांच्याकडे महादेवाची संपत्ती म्हणून असते आणि महादेवाचे प्रतिनिधी म्हणून आपले सदैव रक्षक म्हणून त्याची पूजा केली जाते. ज्यांच्याकडे हे नंदी असतात त्यांची मंदीवर अत्यंत श्रद्धा असते. कोणत्याही परिस्थितीत त्याला विकत नाहीत, असे पोंगेझरा मंदिराचे २५० नंदी आहेत. ज्यांचा नवस पूर्ण होतो त्यांच्या घरी पोंगेझराचे देवघर असते. तेच त्यांचे कुलदैवत असते आणि पुन्हा कोणते मागणे मागायचे असते किंवा मनासारखे प्राप्त झाले की घरुन मंदिरापर्यंत वाज्यागाज्याने यात्रा केली जाते. येथे १५ दिवसांची यात्रा होते, असे इंग्रजांनी १९०८ मध्ये प्रकाशित केलेल्या भंडारा गॅझेट या पुस्तकात वर्णन आहे. असे महत्वाचे तीर्थक्षेत्र असून शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. जमिनदारीतून सिलिंगमध्ये जागा गेली व नागझिरा अभयारण्य बनले. पोंगेझरा हे स्थळ रिझर्व्ह फॉरेस्टच्या ४०२ कम्पार्टमेंटमध्ये येत असून मंदिराच्या जागेवर वनविभागाचा हक्क आहे. भंडारा गॅझेटमध्ये यादी नोंद आहे. बंदोबस्त नकाशात याचा उल्लेख आहे. पण वनविभागाच्या नवीन नकाशात याचा उल्लेख नाही. मंदिराची जीर्ण अवस्था झालेली आहे. श्री शिवमंदिर व मारोती मंदिर ट्रस्ट मंदिराचे जीर्णोद्धार व पर्यटन क्षेत्र विकास आणि भक्तांसाठीच्या व्यवस्था बनवीत असताना यात वनविभाग आड येत आहे. सन १९४५ पासून तेथे दोन कुटुंब महादेवाचे सेवेकरी म्हणून वास्तव्यास आहेत.मागील काही वर्षांपासून मंदिराचे जिर्णोद्धाराचे कार्य सुरू होते ते पूर्ण झालेले आहे. नवीन बांधकाम जुन्या पद्धतीने करण्यात आलेले आहे. ट्रस्टद्वारे प्राकृतिक वातावरणाचा पूर्ण विचार करून कोणतेही नवीन बांधकाम न करण्याचे ठरविले आहे. तरी भाविकांना मंदिरासमोर बसण्यासाठी सभामंडपाची आवश्यकता भाषत आहे. सौर ऊर्जेवर लाईट व भाविकांना येण्या-जाण्यासाठी रस्त्याची अत्यंत गरज आहे. येथे महाशिवरात्री, मकरसंक्रांती, कार्तिक एकादशी, हनुमान जयंतीला भाविकांची चांगलीच गर्दी असते. या शिवाय दररोज शेकडो दर्शनार्थी नवसाला व पिंडदानाला येतात. (शहर प्रतिनिधी)
नागझिऱ्याच्या कुशीतील पोंगेझरा
By admin | Updated: August 3, 2014 23:27 IST