गोंदिया : मतदानाचा हक्क सर्वांनीच बजावला पाहिजे यासाठी मतदारांत जनजागृती करण्याच्या दृष्टीने जनजागृती अभियान राबविण्यात आले. मात्र या अभियानाला पाहिजे तो प्रतिसाद दिसून आला नाही. सन २००९ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत ७०.३८ टक्के मतदानाची नोंद असतानाच यंदा त्यात घट होऊन ६९.११ टक्के मतदानाची टक्केवारी नोंदविण्यात आली आहे. आपल्या एका मतावर देशाचे भविष्य निर्भर असते असे म्हटले जाते व म्हणूनच प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावण्यावर भर दिला जातो. मात्र दिवसेंदिवस मतदानाला घेऊन मतदारांची अनास्था वाढत चालल्याचे दिसून येत आहे. जनजागृतीच्या माध्यमातून तरी मतदार पुढे येतील या विश्वासातून यंदा जनजागृतीवरही भर देण्यात आला. मात्र यातूनही पाहिजे तसे निकाल हाती आले नसल्याचे म्हणता येईल अशी आकडेवारी जिल्ह्यातील चार विधानसभा निवडणुकींची टक्केवारी दाखवून देते. १५ आॅक्टोबर रोजी झालेल्या मतदानात अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात ७१.४६ टक्के, तिरोडा विधानसभा क्षेत्रात ६९.७५ टक्के, गोंदिया विधानसभा क्षेत्रात ६६.२३ टक्के तर आमगाव विधानसभा क्षेत्रात ६९.६२ टक्के मतदानाची नोंद घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे सन २००९ मध्ये घेण्यात आलेल्या विधानसभेच्या निवडणुकांत जिल्ह्यात यापेक्षा जास्त मतदानाची टक्केवारीची नोंद आहे. त्या निवडणुकीत अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात ७३.९२ टक्के, तिरोडा विधानसभा क्षेत्रात ७२.५३ टक्के, गोंदिया विधानसभा क्षेत्रात ६५.०९ टक्के तर आमगाव क्षेत्रात ७० टक्के मतदानाची नोंद आहे.
गेल्या वेळेपेक्षा मतदान १.२७ टक्क्यांनी कमी
By admin | Updated: October 16, 2014 23:26 IST