कपिल केकत गोंदियानिवडणुकीला आता काही दिवसांचा कालावधी उरला असून उमेदवारांकडून आपल्या कार्यकर्त्यांना खुश करण्याचे प्रयत्न केले जात आहे. यासाठी सध्या उमेदवारांना आयते कारण उपलब्ध झाले आहे ते कोजागिरीचे. यामुळेच बघावे तेथे चौकाचौकांत सध्या पॉलिटिकल कोजागिरी साजरी केली जात असल्याचे दिसून येत आहे. मतदानासाठी आता फक्त चार दिवस उरले आहेत. यामुळे उमेदवार जास्तीत जास्त क्षेत्रात पोहचून आपल्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्याची धडपड करीत आहेत. मात्र आजच्या जमान्यात फक्त जनसंपर्काने कामे होत नाहीत ही जाण असलेले उमेदवार कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी पार्ट्यांचे आयोजन करीत आहेत. तर चौकांत उभ्या राहणाऱ्या तरूणांच्या घोळक्यांना खुश करण्याची खबरदारीही उमेदवार घेत आहेत. यासाठी अशा तरूणांच्या घोळक्यांसाठी एखादे आॅफीस खुले करण्यात आले आहे. तर त्यांना खुश करण्यासाठी सध्या कोजागिरीचा चांगला बहाणा उमेदवारांच्या हाती लागला आहे. कार्यकर्ते व प्रत्येकच परिसरातील हे तरूण खुश राहिल्यास आपला प्रचार होणार तसेच मतं पक्की होणार हे कॅल्क्युलेशन आज सर्वच उमेदवार लावत आहेत. नवरात्रीत कार्यकर्ते व तरूण मंडळी उत्सवात व्यस्त राहिल्याने उमेदवारांकडे त्यांनी डिमांड पाठविली नव्हती. मात्र आता निवडणुकीचा खरा फायदा घेण्याची वेळ आल्याने तरूणही उमेदवारांच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या संपर्कात येत आहेत. यातूनच पार्ट्या व कार्यक्रमांचे आयोजन सुरू झाल्याचे दिसून येत आहे. पाच वर्षांतून एकदाच नेते मंडळींना कापण्याची संधी हाती लागत असल्याने आलेली संधी सुटता कामा नये अशी धारणाही तरूणांत असते. तर या तरूणांच्या माध्यमातून आपला जनसंपर्क व प्रचार होणार ही बाब उमेदवार जाणून आहेत. त्यामुळे तरूणांवर पैसा खर्च करणे व्यर्थ जाणार नाही हे उमेदवारांना ठाऊक असून ते तरूणांना खुश करण्यासाठी मागे पुढे बघत नाहीत. यामुळेच एका विशेष परिसरातील १५-२० तरूणांना पकडून त्यांच्या इच्छा जाणून तशा पार्ट्या आयोजित करण्याचे सत्र सुरू आहे. विशेष म्हणजे सध्या कोजागिरी साजरी केली जात असून हा एक चांगले कारण उमेदवार व कार्यकर्त्यांच्या हाती लागले आहे. आपल्याकडे असलेल्या तरूणांची संख्या सांगून टोळीचा म्होरक्या त्यांची व्यवस्था करण्याची डिमांड उमेदवारांकडे मांडून सर्वांच्या खानपानाची सेटींग करीत आहे. यातूनच सध्या बघावे त्या चौकात परिसरातील २५-५० तरूणांची कोजागिरी साजरी होत असल्याचे चित्र नजरेत पडते. वास्तवीक ही कोजागिरी पॉलिटिकल कोजागिरी असून त्यामागे उमेदवारांना खुश करण्याचा गेम आहे.
‘पॉलिटिकल कोजागिरी’ला आले उधाण
By admin | Updated: October 11, 2014 01:52 IST