गांधीनंतर मोदी : भरगच्च स्टेडियममध्ये उठला ‘मोदी-मोदी’चा गजरगोंदिया : गोंदिया शहरात देशाचे पंतप्रधान येण्याची ही तिसरी वेळ होती. त्यामुळे गोंदियावासीयांमध्ये पंतप्रधानांना पाहण्याची आणि त्यांना ऐकण्याची उत्सुकता प्रचंड प्रमाणात दिसून आली. दुपारी २ वाजतापासून नागरिकांनी सभास्थळ असलेल्या इंदिरा गांधी स्टेडियममध्ये जागा पकडणे सुरू केले होते. गोंदिया, भंडारा जिल्ह्यासह लगतच्या बालाघाट आणि राजनांदगाव या छत्तीसगड व मध्यप्रदेशातील जिल्ह्यातूनही मोदीप्रेमी लोक त्यांना ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी गोंदियात दाखल झाले होते. या स्टेडियममधील तीनही बाजुची गॅलरी आणि संपूर्ण मैदान पूर्णपणे भरून गेले होते. त्यामुळे सायंकाळी ४.४५ वाजतानंतर स्टेडियमकडे जाणारे मार्ग बंद करण्यात आले. स्टेडियममध्ये जागाच शिल्लक नसल्यामुळे आतमध्ये चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून वरिष्ठांच्या आदेशावरून सुरक्षा कर्मचाऱ्यांनी स्टेडियमकडे जाणारे मार्ग अडवून धरले. त्यामुळे मोदींना प्रत्यक्ष पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी जाणाऱ्यांच्या पदरी निराशा पडली.विशेष गोंदिया व भंडारा जिल्ह्यातून अनेक वाहनांनी नागरिक आणि भाजप कार्यकर्ते आले होते. मात्र सर्वांची वाहने शहराच्या बाहेरच ठेवण्यात आली होती. तेथून दोन ते तीन किलोमीटर पायी चालत हे कार्यकर्ते सभास्थळी दाखल झाले. स्टेडियमच्या शेजारील उंच इमारतींवरही अनेकांनी ठाण मांडले होते. तेथून मोदींना डोळ्यात साठविण्याचा प्रयत्न अनेक उत्साही लोक करताना दिसले.तब्बल दोन ते तीन तासांपासून स्टेडियममध्ये दाखल होऊन पंतप्रधानांची प्रतीक्षा करीत असलेल्या नागरिकांना सायंकाळी ५.१० च्या सुमारास आकाशात मोदींचे विमान दिसले आणि सर्वांनी एकच जल्लोष केला. सायंकाळी ५.४३ ला पंतप्रधान मोदी इंदिरा गांधी स्टेडियममध्ये दाखल झाले आणि ५.५६ ला त्यांनी भाषणाला सुरूवात केली. ६.३० त्यांचे भाषण समाप्त झाले. या सभेचे वैशिष्ट्य म्हणजे नागरिकांमध्ये असलेला ‘मोदी फिव्हर’. अधूनमधून ‘मोदी-मोदी’ असे नारे लावत नागरिकांनी स्टेडियम अंगावर घेतले.गोंदियातील सभेची क्षणचित्रेपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आगमनापूर्वी गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील भाजपाच्या उमेदवारांनी भाषणबाजी करीत आपापली बाजू मांडली. आपापल्या क्षेत्रातील प्रचाराचे मुद्दे त्यांनी यावेळी भाषणातून मांडले. यात आधी गोंदिया जिल्ह्यातील उमेदवारांना संधी मिळाली. मात्र भंडारा जिल्ह्यातील उमेदवारांची वेळ आली त्यावेळी मोदींच्या आगमनाची वेळ झाली होती. त्यामुळे संचालनकर्ते दीपक कदम यांनी त्यांना थोडक्यात मनोगत व्यक्त करण्यास सांगितले. पण त्यांना अवघी पाच मिनिटेही मिळाली नाहीत.मोदींचे भाषण सुरू झाले त्यावेळी अंधार पडायला सुरूवात झाली होती. परंतू मंचावर कोणताही फोकस लाईट नव्हता. त्यामुळे शुभ्र पांढऱ्या कपड्यातील मोदींचा चेहरा स्पष्टपणे दिसेनासा झाला होता. दूरवर गॅलरीत बसलेल्यांना मोदींना पाहता यावे यासाठी पोडियमवर एक छोटा टॉर्च लाईट लावण्यात आला होता.मात्र तरीही मोदींचे हावभाव समोर बसलेल्या प्रेक्षकांनाही टिपणे शक्य होत नव्हते.पंतप्रधान मोदींचे भाषण सुरू होण्यापूर्वी खा.नाना पटोले यांना बोलण्याची संधी देण्यात आली. त्यांनी भाषणाला सुरूवात केली. मात्र मोदींना ऐकण्याची उत्सुकता लागलेल्या प्रेक्षकांनी भाषणादरम्यान दोन वेळा ‘मोदी-मोदी’ असा गजर सुरू केला. अखेर त्यांना भाषण आवरते घ्यावे लागले.पंतप्रधानांनी आधी आपल्या भाषणाची सुरूवात मराठीत सुरू केली. ‘मंचावर बसलेले...’ असे म्हणत त्यांनी सर्वांची नावे घेतली आणि नंतर हिंदीतून भाषणाला सुरूवात केली. यावेळी सर्वांनी एकच जल्लोष करीत टाळ्यांचा गजर करून त्यांच्या मराठी संवादाला प्रतिसाद दिला.मी लोकसभा निवडणुकीच्या वेळी येऊ शकलो नाही. त्यामुळेच आता तुमचे कर्ज चुकविण्यासाठी आलो आहे. मते मागण्यासाठी आलो नाही, असे सांगून त्यांनी लोकसभेतील विजयासाठी आभार व्यक्त केले.
पंतप्रधानांचे आगमन आणि उत्सुकता
By admin | Updated: October 5, 2014 23:06 IST