गोंदिया : आपला व्यवसाय बुडेल या भीतीने शहराच्या गणेशनगरातील अशोक बाबूलाल कौशिक (४५) यांचा खून करण्यासाठी ५ लाखांची सुपारी देण्यात आली. त्या सुपारीचे २ लाख २० हजार रुपये आरोपीला मिळाले. सुपारी घेऊन अशोक कौशिक यांच्या डोक्यावर गोळी झाडून २१ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता खून करण्यात आला. या प्रकरणात गोंदिया शहर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. कौशिक यांच्या खुनाचा कट मागील तीन महिन्यांपासून रचण्यात आला होता, अशी माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी दिली आहे.
पोलीस अधीक्षक पानसरे पुढे म्हणाले, गोंदिया शहरातील एनसीसी ट्रान्सपोर्टचे मालक अशोक बाबूलाल कौशिक (४५) हे आरोपी चिंटू शर्मा (३५), रा. सर्कस ग्राउंडजवळ, गोंदिया याच्या जिममध्ये जात होते. काही दिवसांपासून अशोक कौशिक नवीन टेक्नॉलॉजीची जिम चिंटू शर्मा यांच्या जिमच्या बाजूलाच टाकणार होते. यामुळे आपला व्यवसाय बुडेल या भीतीने चिंटू शर्मा याने पाच लाखांत अशोक कौशिक यांची सुपारी दिली. आरोपी सतीश बनकर (३०), रा. छोटा गोंदिया याने ही सुपारी पाच लाखांत घेतली. त्या पाच लाखांपैकी २ लाख २० हजार रुपये सतीशला आरोपी दीपक भुते (३२), रा. छोटा गोंदिया याने नेऊन दिले. मागील तीन महिन्यांपासून २ लाख २० हजार रुपये टप्प्याटप्प्याने आरोपी बनकरला देण्यात आले होते. एका मोटारसायकलवर जाऊन सतीश बनकर याने सकाळी ७ वाजता गोंदियाच्या सर्कस मैदानावर मॉर्निंग वाॅक करीत असताना अशोक कौशिक यांच्या डोक्यावर गोळी झाडून त्यांचा खून केला. या प्रकरणात आरोपी सतीश बनकर, जिम चालक चिंटू शर्मा व जिममधील असिस्टंट दीपक भुते या तिघांना गोंदिया शहर पोलिसांनी २१ ऑगस्ट रोजी अटक केली आहे. कौशिक सोबत आरोपींची ओळख असल्याने गाडीचे पेट्रोल संपले असे दाखवून कौशिकला आरोपीने जवळ बोलावले. तो जवळ येताच मागूून त्याच्यावर गोळी झाडण्यात आली, असे सांगण्यात आले. पत्रकार परिषदेला उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे, गोंदिया शहरचे ठाणेदार महेश बनसोडे, एलसीबीचे बबन आव्हाड उपस्थित होते.
...........
बॉक्स
६ तासांत आरोपीला अटक
या प्रकणातील आरोपींना अटक करण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी पोलीस नायक सुबोध बिसेन, अरविंद चौधरी, छगन विठ्ठले यांनी केली आहे. सोबतच सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील, सहायक पोलीस निरीक्षक विजय राणे, पोलीस उपनिरीक्षक तेजेंद्र मेश्राम, पोलीस अंमलदार पोलीस नायक उईके, पोलीस नायक योगेश बिसेन, चौधरी, रहांगडाले, शेंडे, मेश्राम, विठ्ठोले, वेदक यांनी केली आहे.