कंत्राटी नर्सेस युनियन : आरोग्यमंत्र्यांना दिले निवेदनगोंदिया : महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियन (आयटक) च्या वतीने नागपूर येथील नेहरु भवन ते विधानभवन येथे नर्सेसच्या विविध मागण्यांना घेऊन अध्यक्ष हौसलाल रहांगडाले, सचिव प्रमिता मेश्राम, राज्य सचिव आयटक शिवकुमार गणविर यांच्या नेतृत्वात १७ डिसेंबर रोजी मोर्चा काढण्यात आला. श्रीमेहनी कॉम्प्लेक्स जवळ पोलिसांनी मोर्चा अडवला. या ठिकाणी नर्सेसनी राज्य शासना विरोधात घोषणा दिले आयटकच्या नेत्यांनी भाषणे दिली. आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत व आरोग्य राज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांना हौसलाल रहांगडाले, प्रतिमा मेश्राम, उपाध्यक्ष अर्चना कांबळे, सुलोचना रहांगडाले, ललीता गौतम या पाच लोकांच्या प्रतिनिधी मंडळाने निवेदन सादर केले. त्यात सन २००७ पासून कार्यरत कंत्राटी नर्सेस यांना कंत्राटवर न ठेवता शासन सेवेत ए.एन.एम., एल.एच.यू.एस.एन. यांना कायम करा, ज्येष्ठता यादीनुसार परीक्षा व वयाची अट न ठेवता नियमित करा, गोंदिया जिल्हा संपूर्णपणे नक्षलग्रस्त असल्यामुळे एप्रिल २०१३ ते डिसेंबर २०१३ पर्यंत गोंदिया, आमगाव, गोरेगाव, तिरोडा या चार तालुक्यातील प्रत्येक नर्सला तीन हजार रुपये प्रमाणे नऊ महिन्यांचे २७ हजार रुपये एरियस देण्यात यावा, वाढत्या महागाईमुळे मानधनात ३१ मार्च २०१२ चा शासन निर्णय प्रमाणे आठ टक्के वाढ देण्यात यावे, प्रवासभत्ता एकत्र ५०० रुपये कमी असल्यामुळे भत्यामध्ये वाढ करा, प्रसुती रजा सहा महिन्यांची करा, सर्व कंत्राटी नर्सेसना विमा आरोग्य विभाग मार्फत बिमा लागू करा, कुवर तिलकसिंह जिल्हा रूग्णालय व शहरी विभागात कार्यरत नर्सेसना नक्षलभत्ता सह ११ हजार रुपये वेतन देण्यात यावे या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. नर्सेसच्या मागण्यांना लक्षात घेत आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी प्रतिनिधी मंडळाला मागण्यांवर योग्य निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिले आहे. एन.आर.एच.एम.ची डायरेक्ट कुंदन यांना सखोल कारवाईचे आदेश दिले आहे. तसेच राज्य मंत्री प्रा. राम शिंदे यांनी नर्सेसच्या मागण्या मार्गी लाऊ असे विधानभवनात प्रतिनिधी मंडळाला सांगितले आहे. या आंदोलनात प्रामुख्याने मेघा क्षीरसागर, स्वप्नावली ठवकर, ग्रिष्मा वाहने, नलिनी मारबदे, सरिता वानखेडे, भारती सोनकनेवरे, मंगला बाबरे, अनिता सोनवाने, भुमेश्वरी सोनवाने, सरिता तिवारी, चरणदास भावे यांच्यासह शेकडो कंत्राटी नर्सेस कर्मचारी मोर्चात शामिल होत्या. (शहर प्रतिनिधी)
शासन सेवेत कायम करा
By admin | Updated: December 20, 2014 22:43 IST