गोंदिया : विधानसभा निवडणुकीसाठी नामांकन भरण्याच्या अखेरच्या दिवशी गोंदिया विधानसभा मतदार संघातून आ.गोपालदास अग्रवाल यांनी मोठी रॅली काढून नामांकन दाखल केले. तत्पूर्वी सर्कस मैदानावर जाहीर सभा घेऊन संबोधित केले. जनहिताची कामे करूनच आपण लोकांचा विश्वास जिंकला आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.शहराच्या मुख्य बाजार लाईनमधून मार्गक्रमण करीत रॅली उपविभागीय अधिकारी कार्यालयावर पोहोचली. तिथे एसडीओ के.एन.के.राव यांच्याकडे आ.अग्रवाल यांनी नामांकन दाखल केले. यावेळी प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी पृथ्वीपालसिंग गुलाटी, न.प.चे पक्षनेता राकेश ठाकूर, नगर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चौधरी, जिल्हा काँग्रेसचे महासचिव अमर वराडे, जिल्हा प्रवक्ता अनिल गौतम, लोकसभा युकाँ अध्यक्ष प्रफुल्ल अग्रवाल यांच्यासह मतदार संघातील अनेक आजी, माजी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.सकाळी १० वाजतापासून मतदार संघातील विविध भागातून नागरिक सर्कस मैदानात दाखल होत होते. यावेळी सर्कस मैदानात जाहीर सभा घेण्यात आली. त्यात बोलताना आ.अग्रवाल म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडीे तुटली असतानाही एवढ्या मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले. ही आपल्या कामाची पावतीच आहे. ही गर्दी म्हणजे जातीयवादी शक्तींच्या तोंडावर जबरदस्त चपराक आहे. आपल्यासाठी निवडणूक जिंकणे महत्वाचे नाही. परंतू ही निवडणूक जिंकणे म्हणजे सर्वसामान्य नागरिकांचा विजय असल्याचेही ते म्हणाले.यावेळी आ.अग्रवाल यांनी आपल्या कार्यकाळात झालेल्या विविध विकास कामांचा ऊहापोह करीत अपूर्ण राहिलेली कामे नंतरच्या काळात निश्चितपणे पूर्ण केली जातील अशी ग्वाही दिली. या भागातील विकासकामांवरच मतदार संघातील नागरिक आपल्याला मतदान करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (जिल्हा प्रतिनिधी)
जनहिताची कामे करून जिंकला लोकांचा विश्वास- अग्रवाल
By admin | Updated: September 27, 2014 23:18 IST