अर्जुनी मोरगाव : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीच्या दृष्टिकोनातून बालक, पालक व शिक्षक यांच्या समन्वयाची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शाळा नेहमीच प्रयत्नशील असते, परंतु पालकांनीसुद्धा शाळेला सहकार्य करून शाळेविषयी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा, असे प्रतिपादन जीएमबी इंग्लिश मिडिअम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य वीणा नानोटी यांनी केले.
वर्ग दहावीच्या पालक-शिक्षक सभेत अध्यक्ष म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी संस्थेचे सचिव अनिल मंत्री, पालक अतिथी रवी मेश्राम, रचना बोरकर यांची उपस्थिती होती. कोविड १९ च्या प्रभावामुळे लॉकडाऊनंतर २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू झाल्यानंतर वर्ग दहावीची प्रथमच पालक-शिक्षक सभा घेण्यात आली. यावेळी अनिल मंत्री यांनी मार्गदर्शन करताना, विद्यार्थ्यांनी प्रगतीसाठी अभ्यास अशा प्रकारे करावा, जेणेकरून त्यांची यशस्वी जीवनाकडे वाटचाल होऊ शकेल. आपल्याला जर जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर अभ्यास आणि मेहनत या दोन गोष्टींची आवश्यकता असल्याचे सांगितले. सभेत विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करता विद्यार्थ्यांच्या पालकांना येणाऱ्या अभ्यासविषयक अडचणी, मासिक व सराव परीक्षांचे आयोजन, एका बेंचवर दोन विद्यार्थ्यांना बसविणे, मास्क लावणे अनिवार्य, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, आजारी विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविणे, शाळा दररोज सॅनिटायझर करणे आदी विषयांवर चर्चा करून सर्व ठरावांना पालकांनी एकमताने मंजुरी दिली. सभेला ५० पालकांची उपस्थिती होती.