मुंडीकोटा :परिसरात शेतकऱ्यांनी धान बियाणे खरेदी करून शेतात पेरले. मात्र ते उगवलेच नसल्याने मुंडीकोटा परिसरातील शेकडो शेतकऱ्यांची कंपनीकडून फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. यात शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणूक झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील यशोदा हायब्रीड सिड्स व रामसिंग सन्स या कंपन्यांचे सदर बियाणे असल्याची माहिती समोर आली आहे. मुंडीकोटा येथे सहा कृषी केंद्र आहेत. या कृषी केंद्रातून खरीप हंगामासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने धान शेती करण्यासाठी बियाण्यांची खरेदी केली. पावसाळ्यापूर्वी शेतीची मशागत करून त्यात धानाची पेरणी केली. आठवडा भरापूर्वी पेरणी केलेल्या धानाच्या बियाण्यांवर पावसानंतर उगवण होवून त्यातून धानाची रोवनी होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांची होती. मात्र बऱ्यापैकी पाऊस पडल्यानंतरही या बियाण्यांची उगवण झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे पेच निर्माण झाला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या कृषी केंद्र संचालकांकडे संपर्क केला. मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. वर्धा जिल्ह्यातील या कंपन्याकडून खरेदी केलेले धान बियाणे शेतकऱ्यांना विकले, मात्र ते उगवले नसल्याची ओरड त्यांच्याकडून होत असल्याने कृषी केंद्र चालकांची धावपळ सुरू झाली आहे. यातील अनेकांनी शेतकऱ्यांना दुसऱ्या कंपनीचे धान बियाणे दिले तर काही संचालकांनी खरेदी केलेल्या धान बियाणांचे बिल परत मागवून त्यांना धमकाविण्याचा प्रकार सुरू केला असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे. (वार्ताहर)
शेतकऱ्यांनी पेरलेले धान उगवलेच नाही
By admin | Updated: July 13, 2016 02:29 IST