गोंदिया : एखादे काम सकारात्मक वृत्तीने करायचे म्हटले की त्यासाठी अनेक पर्याय व मार्ग खुले होतात. गरज असते फक्त पुढाकार घेण्याची. असाच सकारात्मक पुढाकार घेऊन उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते आणि गोंदियाचे तहसीलदार आदेश डफळ यांनी कोविडच्या अत्यंत कठीण काळात गोंदिया येथील श्याम इंटरप्राईजेस यांचा ऑक्सिजन रिफिलिंग प्लांट दोन शिफ्टमध्ये सुरू केला आहे. यामुळे ऑक्सिजनची कमी काही प्रमाणात तरी दूर होण्यास मदत होणार आहे.
जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या दररोज वाढत असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. हा तुटवडा दूृर करण्यासाठी यंत्रणा प्रयत्न करत आहे. अशात ऑक्सिजन तुटवडा कमी करण्यासाठी काय करता येईल या दृष्टीने उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते आणि तहसीलदार आदेश डफळ यांनी पावले टाकली. गोंदिया येथे श्याम इंटरप्राईजेस यांचा ऑक्सिजन रिफिलिंग प्लांट आहे; पण हा प्लांट फक्त एका शिफ्टमध्ये काम करत होता. त्यामुळे मोजके सिलिंडर रिफिल होऊ शकत होते. त्यांच्याकडे तांत्रिक मनुष्यबळदेखील फार कमी होते. त्यांना तांत्रिक मनुष्यबळाची गरज होती. जिल्हाधिकारी यांच्या सूचनेवरून तिरोडा येथील अदानी पॉवर कंपनीने तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करून दिले. तांत्रिक मनुष्यबळ, श्याम इंटरप्राईजेस आणि सिलिंडर भरण्यासाठी लागणारे मजूर, हमाल, तांत्रिक कर्मचाऱ्यांची वाहतूक, त्यांची जेवण्याची, राहण्याची व्यवस्था या सर्व बाबी उपविभागीय अधिकारी गोंदिया आणि तहसीलदार गोंदिया यांनी अगदी अल्प वेळेत घडवून आणल्या. सोमवारी रात्री नऊ वाजेपासून महसूल विभागामार्फत अदानी पॉवर कंपनीच्या तंत्रज्ञांच्या मदतीने गॅस रिफिलिंगची दुसरी शिफ्ट श्याम इंटरप्राईजेस येथे सुरू करण्यात आलेली आहे. यामुळे ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध व्हायला फार मोठी मदत होणार आहे. मनात आणले तर अधिकारी अशक्यही शक्य करून दाखवू शकतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
......
मनुष्यबळ करून दिले उपलब्ध
कोरोनाचा प्रादुर्भाव व वाढती रुग्णसंख्या पाहता उपचारासाठी ऑक्सिजन पुरवठा अत्यंत गरजेचा झाला आहे. सगळीकडे ऑक्सिजनची कमी असताना केवळ मनुष्यबळ नसल्यामुळे ऑक्सिजन निर्मितीचे काम थांबू नये ही बाब उपरोक्त अधिकाऱ्यांनी ओळखली व सामाजिक कर्तव्याच्या भावनेतून मदत तर केलीच सोबतच कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व जेवणाचीही व्यवस्था केली. जवळजवळ अशक्य वाटणारे हे काम अगदी अल्प कालावधीत यशस्वीपणे सुरू केल्याबद्दल उपविभागीय अधिकारी गोंदिया आणि तहसीलदार गोंदिया यांचे कार्य कौतुकास पात्र ठरले आहे.