नरेश रहिले - गोंदियासंपूर्ण जिल्हाभरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतर्फे मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा केला जात आहे. लहान-मोठी हजारावर मंडळे आहेत. त्यातल्या त्यात पोलिसांकडून परवानगी घेणारे ८४७ मंडळे आहेत. परंतु यापैकी फक्त ३१ गणेशोत्सव मंडळानीच अधिकृतरित्या विद्युत कनेक्शन घेतले आहे. उर्वरीत ८१६ गणेशोत्सव मंडळ बाजूच्या घरातील वीज किंवा चोरीची वीज वापरत आहेत, याची चौकशी करण्यात येणार आहे.गणेशोत्सव साजरा करणाऱ्या उत्सव मंडळाने या उत्सवासाठी महावितरणकडे अर्ज करायला हवा होता. गोंदिया जिल्ह्यातील ८४७ उत्सव मंडळांनी आपापल्या पोलीस ठाण्यांत गणेश स्थापनेची परवानगी घेतली. परंतु यापैकी ८१६ गणेश मंडळांनी विद्युत कनेक्शन करीता अर्जच केले नसल्यची बाब पुढे आली आहे. त्यामुळे बहुतांश मंडळे चोरीची वीज वापरण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मंडप आणि रोषणाईवर मात्र लाखो रुपये खर्च केले जाणार आहेत.जिल्ह्यात हजारोच्या संख्येत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. मागील ३ वर्षापासून गणशोत्सव मंडळांवर दामिनी पथक कारवाई करणार, अशा बातम्या वृत्तपत्राच्या माध्यमातून झळकत असतात. मात्र एकाही मंडळावर कारवाई केल्याचे उदाहरण जिल्ह्यात नाही. गणेशोत्सवातील रोषणाईसाठी वापरण्यात येणारी वीज ही चोरीची असल्याने विद्युत वितरण विभागातर्फे या वीज चोरीवर आळा घालण्यासाठी दामिनी पथक नेमण्यात आले. परंतु हे पथक गणेश स्थापनेच्यापुर्वी माध्यमांना कारवाई करणार असल्याच्या बातम्या पुरविते, मात्र प्रत्यक्ष कारवाई का करीत नाही, असे सुज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे.सर्रास रस्त्यावरून जाणाऱ्या वीजवाहक तारांवर आकडे टाकून मोठ्या प्रमाणात वीज चोरी केली जाते. दोन वर्षापूर्वी ८५ मंडळांकडून विद्युत कनेक्शनसाठी अर्ज करण्यात आले होते. त्या गणेशोत्सव मंडळांना कनेक्शन विद्युत विभागाने दिले. मात्र हजारोच्या जवळ असलेल्या गणेशोत्सव मंडळांनी वीज कनेक्शनसाठी अर्जच केले नाही. तरीदेखील गणेशोत्सव रोषणाईने साजरा करण्यात येत आहे. गोंदिया विभागातंर्गत यंदा १३ मंडळांनी तर देवरी विभागातंर्गत १८ मंडळांनी विद्युत कनेक्शन घेतले आहे. या व्यतीरिक्त १० मंडळांनी अर्ज केले. त्यांना विद्युत विभागाने डिमांड दिले. टेस्ट रिपोर्ट दिला. परंतु त्य मंडळांनी पैसेच भरले नाही. गोंदिया शहरात ८० च्या घरात सार्वजनिक उत्सव मंडळ आहेत. मात्र यापैकी फक्त आठ मंडळांनी विद्युत कनेक्शन घेतले आहेत. ज्या गणेश उत्सव मंडळांनी वीज कनेक्शन घेतले नाही ते मंडळ शेजारच्या घरच्या कनेक्शन वरून वीज वापरत आहेत. तर काही चोरीची वीज वापरत आहेत.आकडा टाकून विद्युत चेरी करणाऱ्या मंडळांवर विद्युत विभागाची करडी नजर आहे. विद्युत विभागाने जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांना वीज कनेक्शन घ्या, असा संदेश दिला. तरीदेखील अनेक मंडळांनी अर्ज न करताच उत्सव साजरा करीत आहेत.
८४७ पैकी ३१ गणेश मंडळांनी घेतले वीज कनेक्शन
By admin | Updated: August 30, 2014 23:55 IST