आवत्या ६ हजार ९०० हेक्टरवर : रोपवाटिका १५ हजार ३४६ हेक्टरमध्येगोंदिया : गरजेच्या वेळीच हुलकावणी देणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा रोवणीचा काळ लांबला आहे. वरथेंबी पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी आता रोपवाटिका घालायला सुरूवात केली आहे. तर ज्यांच्याकडे पाण्याची सोय उपलब्ध आहे, त्यांनी धानपिकांची रोवणी सुरू केली आहे. मात्र ही रोवणी जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ३६९ हेक्टरमध्येच करण्यात आल्याची नोंद जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने घेतली आहे.यावर्षी एक लाख ९७ हजार ४०० हेक्टरमध्ये खरिपाचे पीक घेण्याचे उद्दिष्ट आहे. यात १.९० लाख हेक्टरमध्ये धान पिकाची लागवड व सात हजार ४०० हेक्टरमध्ये तुरीचे पीक घेण्यात येईल. मागील वर्षी १.८७ लाख हेक्टरमध्ये भातपीक व सात हजार १०० हेक्टरमध्ये तुरीच्या पिकाचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले होते. यंदा पाऊस पडण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेत सातत्य नसल्यामुळे वरथेंबी पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या जीवात जीव नाही. याही वर्षी कर्जात व आर्थिक तंगीमध्ये दिवस काढावे लागतील काय? अशी समस्या त्यांच्यापुढे उभी ठाकली असून त्यांचे डोळे सतत आभाळाकडे लागले आहेत. मागील वर्षी आतापर्यंत ८०.८ टक्के पाऊस पडला होता, मात्र यावर्षी आतापर्यंत केवळ ७२.३ टक्केच पाऊस झाला आहे. त्यातच यावर्षी ७ जुलैपर्यंत तिरोडा तालुक्यात सर्वाधिक पाऊस (३१३.४ मिमी) झाला आहे. तर सर्वात कमी पाऊस गोंदिया तालुक्यात (१३५.६ मिमी) पाऊस झालेला आहे.जिल्ह्यात १७ हजार ५०० हेक्टर रोपवाटिकेचे सर्वसाधारण क्षेत्र आहे. मात्र आतापर्यंत केवळ १५ हजार ३४६ हेक्टर क्षेत्रात नर्सरी घालण्यात आली आहे. तर आवत्या सहा हजार ९०० हेक्टरमध्ये व रोवणी केवळ ३६९ हेक्टरमध्ये झाल्याची नोंद आहे. यात गोंदिया तालुक्यात नर्सरी ३ हजार ०६१ हेक्टर, आवत्या ८७७ हेक्टर व रोवणी १०८ हेक्टरमध्ये, गोरेगाव तालुक्यात नर्सरी एक हजार ६४०, आवत्या ५६३ व रोवणी ९९ हेक्टरमध्ये, सालेकसात नर्सरी एक हजार ४४१, आवत्या ८२७ व रोवणी १२८ हेक्टरमध्ये, तिरोड्यात नर्सरी दोन हजार ७३८, आवत्या ६३ व रोवणी १७ हेक्टरमध्ये, आमगावात नर्सरी एक हजार २७३, आवत्या ९० व रोवणी ३६ हेक्टरमध्ये, अर्जुनी-मोरगावात नर्सरी एक हजार ९४७, आवत्या ५६९ व रोवणी ५६ हेक्टरमध्ये, सडक-अर्जुनीत नर्सरी एक हजार ५६१, आवत्या ४८६ व रोवणी २३ हेक्टरमध्ये व देवरी तालुक्यात नर्सरी एक हजार ६५५, आवत्या चार हजार ३०२ हेक्टरमध्ये तर रोवणीचे प्रमाण शून्य आहे. (वार्ताहर)जिल्ह्यातील जलाशये तहानलेलीचजिल्ह्यातील धरणे व मोठ्या प्रकल्पात क्षमतेपेक्षा अत्यल्प पाणीसाठा असल्याचे दिसून येत आहे. इटियाडोह धरणाची क्षमता ३१८.८५ दलघमी असताना आतापर्यंत ४६.४६ दलघमी पाणी साठा आहे. शिरपूर जलाशयाची क्षमता १९२.५६ दलघमी असून सध्याचा साठा केवळ १३.१२ दलघमी आहे. पुजारीटोला जलाशयाची क्षमता ४८.६९ दलघमी असून सध्याचा साठा ३.२० दलघमी आहे. कालीसराड जलाशयाची क्षमता २७.७५ दलघमी असून आजचा साठा निरंक आहे.जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे, त्यांनी रोपवाटिका लावली होती. मात्र ज्यांची शेती वरथेंबी पावसावर अवलंबून आहे, त्यांनी आता रोपवाटिकेची सुरूवात केलेली आहे. त्यामुळे नर्सरी करपण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.-ए.एस. भोंगाडे,तंत्र अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, गोंदिया.
केवळ ३६९ हेक्टरमध्येच रोवणी
By admin | Updated: July 8, 2016 01:51 IST