वन विभागाची पदभरती : ३० हजारांवर बेरोजगारांचे अर्जगोंदिया : नागझिरा, न्यू नागझिरा, नवेगाव, कोका अभयारण्ये व नवेगाव राष्ट्रीय उद्यान मिळून नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प घोषित करण्यात आले. त्यात प्रादेशिक वन विभाग व वन्यजीव विभाग यांनी संयुक्तरित्या वनरक्षक व वन निरीक्षकांच्या पदभरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर तब्बल ३० हजारांवर बेरोजगारांचे अर्ज आले. त्याची पहिली पायरी पूर्ण झाली असून आता दुसऱ्या फेरीसाठी उमेदवारांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. पदसंख्येनिहाय तिप्पट म्हणजे ३२४ उमेदवारांची निवड पुढच्या फेरीसाठी करण्यात येणार आहे.नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव प्रकल्पासाठी एसटीपीएफ (स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स) तयार करण्यात येणार आहे. या व्याघ्र संरक्षण दलासाठी वन व वन्यजीव विभाग कामात गुंतले होते. वनरक्षकांच्या ८१ व वन निरीक्षकांच्या २७ अशा एकूण १०८ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. राज्यभरातील जवळपास ३० हजार उमेदवारांनी त्यासाठी अर्ज केले. या पदभरतीची पहिली प्रक्रिया दौड (रनिंग) चाचणी घेण्यात आली. एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवारांचे आलेले अर्ज पाहून गोंदिया व भंडारा या दोन जिल्ह्यांसाठी गोंदिया येथे व इतर जिल्ह्यातील उमेदवारांसाठी नागपूर येथे पहिली चाचणी घेण्यात आली. त्यासाठी जवळपास १५-१५ हजार उमेदवारांची दोन भागात विभागणी करण्यात आली होती.सध्या पुढच्या फेरीसाठी उमेदवारांच्या माहितीची डाटा जमविणे सुरू असून ८१ वनरक्षक व २७ वन निरीक्षक अशा एकूण १०८ पदसंख्येच्या तिप्पट उमेदवारांना पुढील फेरीसाठी निवडण्यात येणार आहे. ही ३२४ उमेदवारांची यादी डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र यात रनिंगमध्ये मिळालेल्या गुणांचा आधार तसेच दहावी व बारावीतील गुणांचेही मूल्यामापन करण्यात येणार आहे. मुलाखत नसल्याने दहावी-बारावीतील गुण व रनिंग यांच्या योग्य मूल्यमापनातूनच उमेदवारांची निवड होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पुढच्या फेरीत जाणार केवळ ३२४ उमेदवार
By admin | Updated: November 20, 2015 02:18 IST