गोंदिया : राज्यात कोरोनाचा कहर सुरू असतानाच आतापर्यंत दिलासादायक स्थितीत असलेल्या गोंदिया जिल्ह्यातही आता खऱ्या अर्थांने कोरोना आपला रंग दाखवीत असल्याचे दिसून येत आहे. कारण जिल्ह्यातील बाधितांचा आकडा आता शेकड्याने वाढत असून ही रुग्ण वाढ कोरोना उद्रेकाचेच परिणाम आहेत. अशात मात्र आता जिल्हावासीयांनी गांभीर्याने घेण्याची गरज असून अन्यथा याचे परिणाम गंभीर होणार आहेत.
अवघ्या राज्यात कोरोनामुळे गंभीर स्थिती निर्माण झाली असतानाही जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या साधारण होती. यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक दिसून येत नव्हता. परिणामी, जिल्हावासी कोरोनाला विसरून मनमर्जीने वागताना दिसत होते. मात्र, हळूहळू बाधितांची संख्या वाढताना दिसत असतानाच शनिवारी (दि.२७) जिल्ह्यात १०० बाधितांची नोंद घेण्यात आली आहे. नवीन वर्षातील ही सर्वाधिक आकडेवारी असून असे असतानाच रविवारी (दि.२८) जिल्ह्यात १०७ बाधितांची नोंद घेण्यात आली आहे. सलग २ दिवस बाधितांची संख्या शेकडा गाठत असल्याने आता मात्र जिल्ह्यातही कोरोनाचा उद्रेक होत असल्याचे हे स्पष्ट संकेत दिसून आले आहेत.
विशेष म्हणजे, ५० च्या आत आलेली बाधितांची संख्या झपाट्याने वाढून ६८४ एवढी झाली आहे. यावरून आता कोरोना आपला रंग दाखवीत असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. एकंदर अवघ्या राज्यातच कोरोनाचा कहर सुरू झाल्याने जिल्ह्यालाही कोरोनाने आपल्या कवेत घेतले आहे. हेच कारण आहे की, जिल्ह्यात रात्री ८ वाजताच दुकान बंद करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. यावरून तरी आता जिल्हावासीयांनी गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
-------------------------------
आता ८ च्या आत घरात
कोरोनाचा वाढता कहर बघता राज्यात रात्री ८ वाजतापासून सकाळी ७ वाजतापर्यंत संचारबंदी लावण्यात आली आहे. यामुळे आता नागरिकांना आता दिलखुलासपणे घराबाहेर फिरणे बंद करावे लागणार आहे. नागरिकांची गर्दी होऊ नये, कोरोनाला पसरण्यासाठी अनुकूल वातावरण मिळू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी, नागरिकांना रविवारपासून रात्री ८ च्या आत घरात व्हावे लागणार आहे.
--------------------
होळीवर कोरोनाचे विरजण
या निर्णयामुळे होळीच्या सणावरही कोरोनाने विरजण घातले आहे. मागील वर्षी कोरोनामुळे होळी साजरी करता आली नव्हती. त्यात यंदाही होळी साजरी करण्यावर निर्बंध आले आहेत. विशेष म्हणजे, होळीला घेऊन लहान मुले जास्त उत्सुक असतात. मात्र, कोरोना परिस्थितीमुळे त्यांना यंदाही होळी साजरी करता येणार नसल्याने चिमुकले हिरमुसले आहेत.