संयुक्त वन व्यवस्थापन समिती : ५ महिन्यांत ३,४१,१६४ रूपयांची आवकसालेकसा : जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील प्रसिद्ध हाजराफाल पर्यटन स्थळात यावर्षी पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. या स्थळ व क्षेताचा विकास आता उपवन संरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांच्या मार्गदर्शनात सालेकसाचे वन परिक्षेत्राधिकारी भागवत देंडे व बीट रक्षक सुरेश रहांगडाले यांनी नवाटोला येथे संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमाने करणे सुरू केले आहे.आता हाजराफालमध्ये पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पूर्वी या क्षेत्रात कोणत्याही प्रकारची सुविधा नव्हती. परंतु नवाटोला येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या युवकांनी या स्थळाला पर्यटकांसाठी सुरक्षित व भीतीमुक्त बनविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या स्थळावर जाण्याचा मार्ग खूप खराब होता. त्या मार्गाची दुरुस्ती, साफसफाई सुरू करण्यात आली. मागील वर्षी १७ आॅक्टोबर २०१४ पासून हाजराफालच्या जवळ नाका लावण्यात आला आहे. या नाक्यावर येथे येणे-जाणे करणाऱ्या लोकांची नोंदणी केली जाते. नोंदणी करताना प्रतिव्यक्ती पाच रूपये व जीप वाहनाचे १० रूपये घेतले जात आहे. सदर रूपये ग्राम विका निधीच्या खात्या जमा केली जाते. त्यातील ५० टक्के रक्कम स्थळाच्या विकासावर खर्च केली जात आहे. तसेच मिळणाऱ्या रकमेतून संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी आपली मजुरीसुद्धा ठरवून घेतली आहे. जी ग्राम विकास निधीतून ५० टक्के खर्च करण्यात आली आहे.या पर्यटन स्थळावर नोव्हेंबर २०१४ ते मार्च २०१५ पर्यंत तीन लाख ४१ हजार १६४ रूपये पर्यटकांद्वारे प्राप्त झाले आहेत. या रकमेचा खर्च याच स्थळाच्या विकासासाठी व वन व्यवस्थापन समितीच्या सदस्यांच्या मजुरीवर खर्च करण्यात आली आहे. त्यांनी केलेल्या कार्यांना पाहून पर्यटकांच्या संख्येत मोठीच वाढ झाली आहे. (प्रतिनिधी)प्रगतिपथावर हाजराफालकचारगड येथील यात्रेदरम्यान पालकमंत्री राजकुमार बडोले, आ. संजय पुराम यांनी या स्थळाच्या विकासासाठी प्रयत्न सुरू केले होते. आता येथे रस्त्याचे खडीकरण सुरू आहे. येथे रोपवेची व्यवस्था करण्यात आली आहे. पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी बोअरवेलसुद्धा मंजूर करण्यात आली आहे. विहिरीवर कोणत्याही प्रकारची दुर्घटना होवू नये यासाठी विहिरीवर जाळी लावण्यात आली आहे. पर्यटकांना बसण्यासाठी चबुतऱ्याचे बांधकाम करण्यात आले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला नालींचे बांधकाम करण्यात आले आहे. पावसाळ्यात काही अघटीत होऊ नये यासाठी माहितीचे फलकही लावण्यात आले आहेत. या स्थळाच्या विकासासाठी व प्राथमिक सोयी-सुविधांसाठी जिल्हा पर्यटन विकास निधीतून सात लाख रूपये मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसांत येथे येणाऱ्या पर्यटकांना आणखी सुविधा मिळू शकतील. आ. संजय पुराम यांनी या स्थळाच्या विकासाकडे लक्ष दिले तर जवळपासच्या गावातील युवा वर्गाला येथे रोजगाराच्या संधीसुद्धा मिळू शकतील.
हाजराफॉलच्या पर्यटकांची संख्या वाढली
By admin | Updated: May 9, 2015 23:51 IST