पणन संचालकांचे आदेश : व्यापाऱ्यांकडून आज खरेदी बंदगोंदिया : बाजार समितीत धानाच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात आतापर्यंत अडतीया (दलाल) शेतकऱ्यांकडून अडत (दलाली) घेत होते. मात्र आता व्यापाऱ्यांकडून ही अडत घेण्याचे आदेश पणन संचालकांनी दिले आहे. त्यामुळे आता कृषी उत्पन्न बाजार समित्यांत अडत्यांना व्यापाऱ्यांकडून अडत घ्यावी लागणार आहे. मात्र व्यापाऱ्यांनी या आदेशाचा विरोध केला असून याविरोधात मंगळवारी (दि.२३) व्यापार बंद ठेवला जाणार असल्याची माहिती आहे. सद्यस्थितीत बाजार समितीतील आडत्यांच्या माध्यमातून होणाऱ्या खरेदी विक्रीच्या व्यवहारात अडते (दलाल) शेतकऱ्यांकडून त्याच्या मालाच्या सुमारे तीन टक्के अडत (दलाली) घेत होते. मात्र आता शेतकऱ्यांची आजची परिस्थिती बघता ही अडत शेतकऱ्यांकडून न घेता व्यापाऱ्यांकडून घेण्याचे पणन संचालकांनी २० डिसेंबर रोजी आदेश काढून त्वरीत लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार येथील बाजार समितीत २२ डिसेंबर रोजी संचालकांची सभा घेऊन या विषयावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर बाजार समितीतील समस्त व्यापारी व अडत्यांची सभा घेऊन त्यांना याबद्दल माहिती देत आदेशाचे पालन करून त्याला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र व्यापाऱ्यांनी हा प्रकार आपल्यावरील अन्याय असल्याचे सांगत त्याचा विरोध केला. (शहर प्रतिनिधी)
आता व्यापाऱ्यांना द्यावी लागणार अडत
By admin | Updated: December 22, 2014 22:49 IST