पांढरी : जवळील मुरदोली येथील चुलबंद जलाशयाचे पाणी पांढरीवरून डुंडा, म्हसवाणीपर्यंत पोहोचत असते. यावर्षी पाऊस कमी प्रमाणात पडल्यामुळे नहराचे पाणी शेतकऱ्यांच्या पेरण्या व रोवणीसाठी सोडण्यात आले आहे. पण पांढरी ते म्हसवाणी लघू कालवा फुटल्याने येथील बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतातील रोवणी वाहून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.मागील कित्येक वर्षांपासून नहराची साफसफाई व दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे बहुतेक ठिकाणी नहर फुटलेले आहे. फुटलेल्या जागेतून सतत पाणी व्यर्थ जात असून शेतकऱ्यांच्या रोवण्याचे बहुतांश: नुकसान झालेले आहे. सलंगटोला, बकीटोला, भोयरटोला, पांढरी हा नहराचा रस्ताही पूर्णपणे खस्ता हालतमध्ये दिसून येत असून येथून दुचाकी तर सोडाच पायदळ जाणाऱ्यांनाही तारेवरची कसरत करावी लागत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून नागरिकांना हीच अवस्था पहावयास मिळत आहे. पण संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे याकडे लक्ष कसे जात नाही? हा चिंतेचा विषय आहे. (वार्ताहर)
कालवा फुटलेल्या अवस्थेत
By admin | Updated: August 3, 2014 23:28 IST