गोंदिया : सध्या सर्वत्र कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहे. याच धर्तीवर गोंदिया रेल्वे स्थानकाच्या उत्तर दिशेकडील प्रवेशव्दार गुरुवारपासून (दि.८) प्रवाशांसाठी बंद करण्यात आले. कोविडचे प्रमाण वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे रेल्वे विभागाने म्हटले आहे.
हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानक हे एक महत्वपूृर्ण स्थानक आहे. सद्यस्थितीत काही विशेष रेल्वे गाड्या सुरु असल्या तरी या रेल्वे स्थानकावरुन दरराेज ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. गुरुवारपासून रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशव्दारावर प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग व तपासणी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे एका बाजूने प्रवाशांना प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे रेलटोली बाजूकडील उत्तर दिशेचे प्रवेशव्दार बंद करण्यात आले आहे. त्यामुळे आता रेलटोलीकडील प्रवाशांना फेरा मारुन मुख्य प्रवेशव्दारावरुन रेल्वे स्थानकावर जाता येणार आहे.
..........
तीन दिवस सात गाड्या राहणार रद्द
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळांतर्गत डोंगरगड, जटकन्हार-मुसरा दरम्यान ऑटोमेटिक सिग्नलचे काम १० ते १२ एप्रिल दरम्यान करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील सात गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात दुर्ग-गोंदिया मेमू, गोंदिया- इतवारी मेमू स्पेशल, इतवारी-गोंदिया, गोंदिया -दुर्ग मेमू स्पेशल, रायपूर -डोंगरगड, दुर्ग-डोंगरगड मेमू, डोंगरगड- रायपूर मेमू, रायपूर-डोंगरगड-दुर्ग मेमू या गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. तसेच गोंदिया-झारसुगुडा व झारसुगुडा मेमू स्पेशल ही गाडी सुध्दा रद्द करण्यात आली आहे.