बोंडगावदेवी : तालुका विधि सेवा समिती अर्जुनी मोरगाव स्थानिक ग्रामपंचायत तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कायदे विषयक मार्गदर्शन शिबिर ग्रामपंचायत सभागृहात आयोजित करण्यात आले होते.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲड. पामेश्वर रामटेके, ॲड. मोहन भाजीपाले, ॲड. श्रीकांत बनपूरककर, ॲड. शहारे, ॲड. कांबळे उपस्थित होते. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य डॉ. शामकांत नेवारे, अमरचंद ठवरे, गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष राजू झोळे, संतोष टेंभुर्णे, रवी बनपूरकर, योगेश बोरकर उपस्थित होते. कायदेविषयक मार्गदर्शन करताना वकील मान्यवरांनी, राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्लीच्यावतीने तालुका विधी सेवा समितीमार्फत जनसामान्यांना कायद्याची जाणीव जागृती होण्याच्या हेतूने कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर आयोजित केले जात असल्याचे सांगितले. समाजहितासाठी कायद्याची माहिती असणे आवश्यक आहे. समाज जीवनात वावरत असताना प्रत्येक मानवाला जन्मापासून कायद्याची गरज भासते, कोणताही व्यक्ती कायदेशीर मार्गदर्शनापासून वंचित राहणार नाही यासाठी राष्ट्रीय विधी सेवा समितीमार्फत प्रयत्न केले जात आहे. कौटुंबिक वाद सामोपचाराने सोडवावा, प्रत्येकाला दैनंदिन जीवनात पावलो पावली कायद्याची गरज पडते. सामान्य जनतेला नवनवीन कायद्याची जनजागृती होण्यासाठी कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात येत असल्याचे वकील मंडळीनी सांगितले. संचालन ॲड. श्रीकांत बनपूरकर यांनी केले तर आभार अमरचंद ठवरे यांनी मानले. हेमंत डोंगरवार, चंद्रशेखर प्रधान, ग्रा. पं. कर्मचारी राष्ट्रपाल ठवरे, गुड्डू मेश्राम, विश्वास लोणारे यांनी सहकार्य केले.