मनोज ताजने गोंदियाराज्यातील सर्वात मोठा औष्णिक वीज प्रकल्प सात वर्षापूर्वी गोंदिया जिल्ह्यात सुरू करण्याचे स्वप्न तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी पाहिले आणि ते काही दिवसातच प्रत्यक्षात साकारले. ज्यावेळी राज्यात पुरेशा वीजेअभावी मोठ्या प्रमाणात भारनियमन केले जात होते त्या दिवसात अदानीसारखा तब्बल ३३०० मेगावॅटचा म्हणजे राज्याच्या आजच्या विजेच्या मागणीतील २० टक्केपेक्षा जास्त वीज निर्मिती करणारा प्रकल्प गोंदियात चार वर्षापूर्वी सुरू झाला. पाहता पाहता राज्य भारनियमनमुक्त झाले. पण आज हा प्रकल्प पाण्याअभावी संकटात सापडला आहे. हे संकट तसे औट घटकेचे आहे, एकदा पावसाळ्याला सुरूवात झाली की प्रकल्पाचे बंद पडलेले सर्व युनिट पुन्हा सुरू होतील यात शंका नाही, पण या संकटकाळात हा प्रकल्प सुरू राहण्यासाठी, अर्थात प्रकल्पाला पाणी पुरवठा करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारमध्ये प्रतिनिधी म्हणून गेलेल्या लोकप्रतिनिधींनी काय प्रयत्न केले, हा चर्चेचा विषय आहे. त्यांचे प्रयत्न कितपत उपयोगी पडले असते हा भाग वेगळा, पण निदान आपल्या भागातील एका उद्योगाची वाताहात होत असल्याचे गाऱ्हाणे त्यांनी सरकार दरबारी मांडणे अपेक्षित होते. मात्र दुर्दैवाने तसे झाले नाही.खा.पटेलांनी हा प्रकल्प आणला म्हणून त्याकडे नकारार्थी भावनेतून पाहणाऱ्यांना आता आपण सत्तेत आलो आहोत, आता तो प्रकल्प सुरू ठेवणे आपल्या सरकारची जबाबदारी आहे याचाही विसर पडला. त्यामुळेच धापेवाडा प्रकल्पातून पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यासोबत अदानी प्रकल्पालाही पाणी मिळाले पाहीजे, असे स्पष्टपणे म्हणण्याची हिंमत कोणी दाखविली नाही. जणूकाही अदानी प्रकल्पाशी आपले काहीच घेणे-देणे नाही, अदानी प्रकल्प जिल्ह्यात असला काय किंवा नसला काय आम्हाला किंवा आमच्या जिल्ह्याला काहीच फरक पडणार नाही, अशीच एक अस्पष्ट भावना नेतेमंडळींच्या सोयीस्कर चुप्पी साधण्यातून जाणवली. यापूर्वी तर काही लोकांनी अदानी प्रकल्प जिल्ह्यासाठी वरदान नसून शाप असल्याचा विखार व्यक्त करून शक्य तितका विरोधही करण्याचा प्रयत्न केला, पण पुढे हा विखार शमला.वास्तविक ज्या धापेवाडा सिंचन प्रकल्पातून अदानी प्रकल्पासाठी पाणी देण्याची सोय केली त्या प्रकल्पासाठी अदानी समुहाने २३३ कोटी रुपये दिले. म्हणूनच या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे बांधकाम वेळेत पूर्ण होऊ शकले. अन्यथा इतर प्रकल्पांसारखा हा प्रकल्पही अनेक वर्षे लालफितशाहीत अडकून वर्षानुवर्षे रखडला असता यात शंका नाही. या प्रकल्पाचे पाणी आज तिरोडा परिसरातील लोकांना मिळत आहे, त्यातून उन्हाळी धानपिकही घेतले जात आहे. या प्रकल्पाने अनेक बेरोजगारांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार दिला. तिरोडा शहराचा कायापालट झाला, लोकांचे जीवनमान बदलले, एवढेच नाही तर परिसरातील १९ गावांना या प्रकल्पाने दत्तक घेऊन त्या ठिकाणी कधी मिळाल्या नाही त्या सोयीसुविधा दिल्या. पण ही सकारात्मक बाजू समजून न घेता सरसकट विरोधासाठी विरोध करणे कितपत योग्य आहे?आज त्यांचा प्रकल्पाला उघड विरोध नसला तरी जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारा एक उद्योग म्हणून जो पाठींबा अपेक्षित आहे तो मात्र दिसत नाही, ही खेदाची बाब आहे. अदानी समुहाला आपला हा प्रकल्प देशात कुठेही उभारता आला असता, पण त्यांनी गोंदिया निवडले. त्याचे श्रेय ज्याला जायचे ते गेले. आता त्यावर राजकारण करण्यात अर्थ नाही. पण आता हा आपल्या जिल्ह्याचा प्रकल्प आहे, तो टिकला पाहिजे, व्यवस्थित चालला पाहीजे ही भावना प्रत्येकाच्या मनात असणे गरजेचे आहे. अन्यथा अदानी वीज प्रकल्पाची जिल्ह्याला गरजच नाही, असे खेदपूर्वक म्हणण्याची वेळ येईल.
अदानी प्रकल्पाची गरज आहे?
By admin | Updated: May 18, 2016 01:57 IST