गोंदिया : पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. परिणामी, सर्वसामान्य आणि गोरगरिबांचे जगणे कठीण झाले आहे. केंद्र सरकारने एकीकडे उज्ज्वला योजनेंतर्गत गाेरगरीब कुटुंबाना गॅस सिलिंडरचे वाटप केले. मात्र दुसरीकडे गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ करून त्यांचे कंबरडे मोडण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्र सरकारच्या या दुट्टपी धोरण व महागाईचा गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि. ५) सायकल चालवून निषेध केला.
जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी दुपारी १ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. माजी आ. राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर यांच्या नेतृत्वात सायकल रॅली काढून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सातत्याने महागाई वाढत आहे. दोन दिवसांपूर्वीच घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती २५ रुपयांनी वाढल्या. तर पॅट्रोलचे दर तब्बल १०६ रुपयांवर पोहोचले आहेत. यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून, जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवून मोदी सरकारने रोजगार हिरावल्याचा आरोप माजी आ. जैन यांनी केला. विजय शिवणकर, नरेश माहेश्वरी, सुनील भालेराव, सुशीला भालेराव, प्रभाकर दोनोडे, के. बी. चव्हाण, आशा पाटील, कुंदा दोनोडे व सुनील पटले यांनीसुद्धा या वेळी केंद्र सरकारवर प्रहार केला. आंदोलनात राजलक्ष्मी तुरकर, प्रभाकर दोनोडे, किशोर तरोणे, केतन तुरकर, गणेश बरडे, रफिक खान, सुनील भालेराव, सुशीला भालेराव, बाळकृष्ण पटले, के. बी. चव्हाण, अशोक शहारे, शिव शर्मा, मनोहर वालदे, मोहन पटले, सुरेश हर्षे, कमलबापू बहेकार, चुन्नीभाऊ बेंद्रे, राजेश कापसे, गोविंद तुरकर, रवी मुंदडा, गणेश बरडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
..........
चुलीवर स्वयंपाक करून नोंदविला निषेध
गॅस सिलिंडरच्या किमती ९०० रुपयांवर पोहोचल्याने गृहिणींचे बजेट बिघडले आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे जगणेसुद्धा कठीण झाले आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ग्रामीण भागातील महिलांना गॅसवरून पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चुलीवर स्वयंपाक करून याचा निषेध नोंदविला.