संतोष बुकावन - अर्जुनी/मोरगावतीन वर्षापूर्वी ‘सारस’ पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या बोंडगाव सुरबन येथील श्रृंगारबांध व नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाच्या तलावात नवनवीन पक्ष्यांचा संचार दिसून येत आहे. देशी-विदेशी पक्षांच्या आगमनाने फुलणारे हे तलाव पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत. सध्या विदेशी पाहुण्यांच्या आगमनाला सुरुवात झाली आहे. हिवाळा ऋतूच्या गुलाबी थंडीला सुरुवात झाली आहे. या काळात देश-विदेशातील विशेषत: सायबेरियन, हिमाचल, तिबेट, उत्तर प्रदेशातील दुर्मिळ पक्षी येथे आवर्जून भेट देतात. व्हाईट आब पोचार्ड, चक्रवाक हार्टर, टेफ्टेड, पीन टेल, जकाना, डकपोचार्ड, पेंटेड स्टॉक या पक्षांचे भिसीकांदा हे आवडते खाद्य असल्याने ते येथे येतात. सद्यस्थितीत अर्जुनी/मोरगाव, नवेगावबांध व बोंडगाव सुरबन या परिसरात राखी धनेश नावाचा पक्षी दिसून येतो. सहसा धनेश हा पक्षी वड व पिंपळाची झाडे असलेल्या जंगलात आढळून येतो. या झाडांवरील सरडे, घुस, उंदीर यासारखे लहान प्राणी हे धनेशचे खाद्य आहे. धनेशची चोच काळ्या-पिवळ्या रंगाची असून लांब, किंचीत वाकलेली असून मानेवर बाशिंगासारखा तुरा असतो. इतर पक्ष्यांपेक्षा घरटे तयार करण्याची पद्धत आगळीवेगळी आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी साधारणत: मे-जून महिन्यात झाडांच्या ढोलीच्या भींत माती व स्वत:च्या विष्ठेने लिपतो व यात मादीला अडकवितो. अंडी उबविण्याच्या कालावधीत केवळ मादीची चोच घरट्याबाहेर दिसते. पिल्यांना अन्न पुरविण्याचे काम नर करतो.सध्या मोठ्या प्रमाणावर जंगलात वृक्षतोड सुरू असते. त्यामुळेच जंगलातील विविध जातीचे पक्षी गावातील वड व पिंपळाच्या वृक्षांकडे धाव घेतात. पक्षांच्या संगोपनासाठी जंगलात वड व पिंपळ झाडांची लागवड करणे गरजेचे आहे. या झाडांवर विशेषत: पिंगळा, मैना, पोपट, घार, बगळे असे विविध प्रजातीचे पक्षी येतात. फळे हे पक्षांचे आवडते खाद्य असते. विशेषत: पिंगळा (घुबड) हा पक्षी झाडांच्या पोखरीत आपले घरटे तयार करुन पिल्लांचे संगोपन करतात. यासाठी झाडांची लागवड मोठ्या प्रमाणावर होण्याचे मत एस.एस. जे. महाविद्यालयाचे जीवविज्ञान विभाग प्रमुख प्रा. गोपाल पालीवाल, प्रा. शरद मेश्राम यांनी व्यक्त केले.
श्रृंगारबांधात नवनवीन पक्ष्यांचा संचार
By admin | Updated: November 9, 2014 22:32 IST