७० टक्के महिलांनी केले मतदान : अर्जुनी(मोरगाव) विधानसभा क्षेत्रात सर्वाधिककपील केकत - गोंदियाबुधवारी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानात जिल्ह्यात आश्चर्यजनक परिवर्तन बघावयास मिळाले. या निवडणुकीत पुरूषांपेक्षा महिला मतदारांनी मतदानाचा हक्क, अर्थात राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यात आघाडी घेतली आहे. निवडणूक विभागाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात पाच लाख १० हजार १८२ महिला मतदार असून यातील ६९.६८ टक्के महिलांनी मतदान केले आहे. तर पुरूष मतदारांपैकी ६८.५३ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. १.१५ टक्के महिला पुरूषांच्या तुलनेत हा हक्क बजावण्यात आघाडीवर राहिल्या.चारही मतदार संघांपैकी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक ७२.२९ टक्के महिलांच्या मतदानाची नोंद करण्यात आली आहे. एरवी दहावी-बारावीच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत नेहमी बाजी मारणाऱ्या मुली आता मतदानासारख्या आपला प्रतिनिधी निवडाच्या महत्वाच्या कामातही पुरूषांपेक्षा कमी नसल्याचे महिलांनीे दाखवून दिले आहे. संविधानानुसार मतदानाचा हक्क सर्वश्रेष्ठ असून प्रत्येकाने मतदान करायलाच हवे यावर पुरेपूर जोर दिला जातो. यंदा तर मतदार जनजागृती अभियान राबवून मतदारांना मतदानासाठी जागृत करण्याचे प्रयत्न ठिकठिकाणी करण्यात आले. या अभियानामुळे खूप असा परिणाम झाल्याचे दिसून आले नसले तरीही जिल्ह्यातील महिला मतदार मात्र जागरूक झाल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे जिल्हाभरातील ५४ उमेदवारांमध्ये केवळ चार महिला उमेदवार होत्या. तरीही मतदान करण्यात मात्र महिलांनी पुढाकार घेतला आहे.जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव, तिरोडा, गोंदिया व आमगाव या चार विधानसभा क्षेत्रांसाठी १५ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्यात आले. मतदानाला घेऊन जिल्हा निवडणूक विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात पाच लाख १२ हजार ६४२ पुरूष तर पाच लाख १० हजार १८२ महिला मतदार आहेत. अशा प्रकारे एकूण १० लाख २२ हजार ८३० मतदार असून यातील सात लाख सहा हजार ८३३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. विधानसभा क्षेत्रनिहाय महिलांच्या मतदानाची आकडेवारी बघितल्यास अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात एक लाख २० हजार ५२९ पुरूष असून यातील ८५ हजार १६३ म्हणजेच ७०.६६ टक्के पुरूषांनी मतदान केले. तर एक लाख १७ हजार ६५ महिला मतदार असून यातील ८४ हजार ६२७ म्हणजेच ७२.२९ टक्के महिलांनी मतदान केले आहे. तिरोडा विधानसभा क्षेत्रात एक लाख १९ हजार ५७९ पुरूष मतदार असून यातील ८२ हजार ६१० म्हणजेच ६९.०८ टक्के पुरूषांनी मतदान केल. तर एक लाख १९ हजार ७१८ महिला मतदार असून ८४ हजार ३०६ म्हणजेच ७०.४२ टक्के महिलांनी मतदान केले आहे. गोंदिया विधानसभा क्षेत्रात एक लाख ४६ हजार १३५ पुरूष मतदार असून यातील ९७ हजार ९७ पुरूषांनी म्हणजेच ६६.४४ टक्के पुरूषांनी मतदान केले. तर एक लाख ४७ हजार ८०४ महिला असून ९७ हजार ५८५ म्हणजेच ६६.०२ टक्के महिलांनी मतदान केले आहे. तसेच आमगाव विधानसभा क्षेत्रात एक लाख २६ हजार ३९९ पुरूष मतदान असून यातील ८९ हजार ४४४ म्हणजेच ६८.३९ टक्के पुरूषांनी मतदान केले आहे. तर एक लाख २५ हजार ५९५ महिला असून ८९ हजार महिलांनी म्हणजेच ७०. ८६ टक्के महिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. गोंदिया विधानसभा क्षेत्रात महिलांच्या तुलनेत पुरूषांची टक्केवारी जास्त असल्याचे दिसून आले. ग्रामीण भागातील महिला शहरातील महिलांच्या तुलनेत अग्रेसर असल्याचे दिसते.
राष्ट्रीय कर्तव्यात महिलाच आघाडीवर
By admin | Updated: October 16, 2014 23:25 IST