गोंदिया : तांब्याचे व चांदीचे भांडे स्वच्छ करून दिल्यानंतर सोन्याचे दागिने स्वच्छ करून देतो, असे बोलून चोरट्याने वृद्धेचे ६३ हजार रुपये किमतीचे दागिने लांबविले. लगतच्या ग्राम कुडवा येथील अभियंता कॉलनीत मंगळवारी (दि.२१) सकाळी १०.२२ वाजता दरम्यान ही घटना घडली.
फिर्यादी (६०) या घरी असताना आरोपी त्यांच्या घरी गेला व वेस्टेज मार्केटिंगचे काम करीत असून त्यांच्याजवळील लिक्विडचा प्रचार करीत असल्याचे सांगितले. तसेच तांबे व चांदीचे भांडे स्वच्छ करून देतो, असे बोलून फिर्यादीचे तांबे व चांदीचे भांडे स्वच्छ करून दिले. त्यानंतर या लिक्विडने सोन्याचे दागिनेही स्वच्छ होतात, असे सांगून एका स्टीलच्या भांड्यात लाल लिक्विडमध्ये सोन्याचे दागिने टाकून २० मिनिटांपर्यंत गॅसवर उकळा व थंड झाल्यावर दागिने काढून असे सांगितले व दुसऱ्या साथीदारासोबत दुचाकीने निघून गेला. फिर्यादीने लिक्विड थंड झाल्यावर बघितले असता लिक्विडमध्ये ४५ हजार रुपये किमतीची सोन्याची गोप व १८ हजार रुपये किमतीच्या २ अंगठ्या, त्यात नव्हत्या. रामनगर पोलिसांनी भादंवि कलम ४२०, ३४ अंतर्गत गुन्हा नोंद केला असून तपास सपोनि वसगडे करीत आहेत.